यूएईमध्ये सुरु असलेल्या आशिया चषक स्पर्धेत आज अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यात लढत होत आहे. सुपर-४ मधील हा पहिलाच सामना आहे. दरम्यान, या सामन्यात श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर सुरुवातीला फलंदाजीसाठी आलेल्या अफगाणिस्तानने श्रीलंकन गोलंदाजांना झोडून काढले असून धावांचा डोंगर उभा केला आहे. अवघ्या २० वर्षांच्या सलामीवीर रहमानउल्ला गुरबाजने तर चौकार षटकार यांचा पाऊस पाडत अवघ्या ४५ चेंडूंमध्ये ८४ धावा केल्या आहेत.
हेही वाचा >>> विश्लेषण : शारजाह स्टेडियमचा इतिहास काय, पाकिस्तानमधून आणली होती माती, जाणून घ्या सविस्तर
सध्या सुरू असलेल्या अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यात रोमहर्षक लढत होत आहे. अफगाणिस्तानने वीस षटकांत १७५ धावा केल्या असून सलामीला आले्या रहमानउल्ला गुरबाजने श्रीलंकन गोलंदाजांना पळता भूई थोडी केली. सलामीला आल्यापासूनच त्याने मोठे फटके मारले. त्याने ४५ चेंडूंमध्ये सहा षटकार आणि चार चौकार लगावत ८४ धावा केल्या. गुरबाजच्या या अनोख्या खेळीमुळेच अफगाणिस्तानला १५० धावांचा पल्ला ओलांडता आला.
हेही वाचा >>> Dhanashree Verma Surgery : धनश्री वर्मावर करण्यात आली शस्त्रक्रिया, फोटो केला शेअर; नेमकं काय झालं होतं?
मात्र सोळाव्या षटकात असिथा फर्नांडोने टाकलेल्या चेंडूला टोलवण्याचा प्रयत्न करताना तो झेलबाद झाला. वानिंदू हसरंगाने त्याचा झेल टिपला. दरम्यान, गुरबाजसोबतच इब्राहीम झरदानने चांगला खेळ केला. त्याने ३८ चेंडूंमध्ये ४० धावा केल्या. गुरबाज आणि झरदानच्या मदतीने अफगाणिस्तानने १७५ धावा केल्या.