आशिया चषक स्पर्धेच्या सुपर-४ मध्ये भारताने पाकिस्तानचा तब्बल २२८ धावांनी पराभव केला आहे. पावसाने व्यत्यय आणलेला हा सामना दोन दिवसांत संपला. रविवारी (१० सप्टेंबर) हा सामना सुरू झाला, मात्र पावसामुळे केवळ २४ षटकांचाच खेळ होऊ शकला. श्रीलंकेतील सध्याचं वातावरण पाहता आयोजकांनी या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला होता. त्यानुसार आज हा सामना २४ षटकांपासून पुढे खेळवण्यात आला. रविवारी खेळ थांबला तेव्हा भारताने २४.१ षटकात २ बाद १४७ धावा जमवल्या होत्या. इथून पुढे खेळताना भारतीय संघाने आज निर्धारित ५० षटकात ३५६ धावांचा डोंगर उभा केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताच्या ३५६ धावांच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या संघाला ३२ षटकांत आठ गड्यांच्या बदल्यात केवळ १२८ धावा करता आल्या. नसीम शाह आणि हरिस रौफ दुखापतीमुळे फलंदाजी करू शकले नाहीत. त्यामुळे ८ गडी बाद होताच पाकिस्तानचा डाव संपला. अशा प्रकारे भारतीय संघाने पाकिस्तानवर तब्बल २२८ धावांनी बलाढ्य विजय मिळवला.

या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केली. कुलदीप यादवने पाच बळी घेत पाकिस्तानचा अर्धा संघ तंबूत धाडला. कुलदीपने ८ षटकात ५ बळी घेतले. त्याला जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी एक बळी घेत चांगली साथ दिली. पाकिस्तानचे दोन फलंदाज दुखापतीमुळे मैदानात उतरलेच नाहीत.

तत्पूर्वी भारतीय फलंदाजांनी शानदार फलंदाजी केली. रविवारी कर्णधार रोहित शर्मा आणि सलामीवीर शुबमन गिल या दोघांनी अर्धशतकं झळकावली. दोघांनी १२१ धावांची सलामी दिली. रोहित ५६ आणि गिल ५८ धावा करून ८ चेंडूंच्या फरकाने बाद झाले. त्यावेळी भारतीय संघ अडचणीत आला आहे असं वाटतं होतं. परंतु, विराट कोहली आणि के. एल. राहुल या दोघांनी भारताचा डाव सावरला.

विराट आणि राहुल या दोघांनी वैयक्तिक शतकं झळकावत तब्बल २३३ धावांची नाबाद भागिदारी केली. या दोघांच्या शतकांच्या जोरावर भारताने ३५० धावांचा टप्पा पार केला. लोकेश राहुलने १०६ चेंडूत १२ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १११ धावा फटकावल्या. तर विराट कोहलीने ९४ चेंडूत ९ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने १२२ धावा फटकावल्या.

हे ही वाचा >> पुनरागमन असावं तर केएल राहुलसारखं! पाकिस्तानविरुद्ध शतक ठोकून केली गौतम गंभीरची बोलती बंद

दरम्यान या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानवर बलाढ्य विजय मिळवला. भारताने पाकिस्तानला २२८ धावांनी नमवलं. एकदिवसीय क्रिकेटमधील भारताचा हा पाकिस्तानवरील आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय आहे. उभय संघांमध्ये बऱ्याचदा अटीतटीचे सामने झाले आहेत. अनेक वर्षांनी या दोन संघांमध्ये असा एकतर्फी एकदिवसीय सामना पाहायला मिळाला. यापूर्वी २००८ मध्ये मीरपूर येथे खेळवण्यात आलेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर १४० धावांनी विजय मिळवला होता. तर कोची येथे २००५ मध्ये उभय संघांमध्ये खेळवण्यात आलेल्या एकदिवसीय सामन्यात भारताने ८७ धावांनी पाकिस्तानचा धुव्वा उडवला होता.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asia cup 2023 india marks biggest odi victory against pakistan broke 15 year old record asc