Asia Cup 2025 Dates Announced: आशिया कप २०२५च्या तारखा समोर आल्या आहेत. आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी तारखांबाबत माहिती दिली आहे. अनेक वाद आणि चर्चांनंतर भारत आणि पाकिस्तान लवकरच क्रिकेटच्या मैदानावर एकमेकांशी भिडताना दिसणार आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील हा सामना २०२५ च्या आशिया कपमध्ये होणार आहे, ज्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
दोन्ही देशांमधील अलिकडच्या संघर्षानंतर आणि क्रिकेट सामन्यांमध्ये बहिष्काराच्या मागण्या असूनही, भारत आणि पाकिस्तान या स्पर्धेतही एकाच गटात असतील आणि त्यांचा पहिला सामना १४ सप्टेंबर रोजी होण्याची शक्यता आहे.
आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी शनिवारी, २६ जुलै रोजी सोशल मीडिया पोस्टमध्ये स्पर्धेच्या तारखा जाहीर केल्या. नक्वी यांनी लिहिलं की ही स्पर्धा यूएईमध्ये होणार आहे आणि ती ९ सप्टेंबर रोजी सुरू होईल आणि अंतिम सामना २८ सप्टेंबर रोजी खेळवला जाईल. पण त्यांनी स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक उघड केलेलं नाही. येत्या काही दिवसांमध्ये वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल असं सांगितलं.
दरम्यान, अहवालात असा दावा केला जात आहे की दरवेळीप्रमाणे या स्पर्धेतही भारत आणि पाकिस्तान एकाच गटात असतील आणि दोघांमधील पहिला गट टप्प्यातील सामना १४ सप्टेंबर रोजी होऊ शकतो. एकंदरीत, जर भारत आणि पाकिस्तान अंतिम फेरीत पोहोचले तर ते ३ वेळा एकमेकांसमोर येऊ शकतात. जरी असं झालं नाही तरी दोन्ही संघ २ वेळा एकमेकांसमोर येऊ शकतात. गट टप्प्याव्यतिरिक्त, भारत-पाकिस्तान सुपर-४ मध्ये देखील एकमेकांसमोर येण्याची अपेक्षा आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दुबई आणि अबुधाबी अशा संभाव्य तटस्थ ठिकाणी स्पर्धा आयोजित करण्याची तयारी दर्शविली आहे. भारताकडे २०२५ च्या आशिया कपचे यजमानपद आहे. पण ते ही स्पर्धा संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये आयोजित करू शकते. बीसीसीआयने आशिया कपसाठी तीन ठिकाणांसाठी अमिराती क्रिकेट बोर्डाशी करार केला आहे, परंतु ते फक्त दोन स्टेडियममध्ये सामने आयोजित करतील.