Asia Cup 2025 PCB Press Conference: आशिया चषकातील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यानंतर मोठा वाद पेटला आहे. भारताच्या खेळाडूंनी सामन्यानंतर पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन केलं नाही आणि यावरून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आणि संघाने मोठा वाद घातला. आयसीसीकडून मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांना आशिया चषकातून काढण्याची मागणी केली होती. पीसीबीचा आरोप होता की पायक्रॉफ्टने सलमान आघाला नाणेफेकीदरम्यान सूर्यकुमारशी हस्तांदोलन करण्यास मनाई केली होती. या प्रकरणानंतर युएईविरूद्ध सामन्याआधी मोठी चर्चा झाली आणि मग संघ सामन्यासाठी मैदानावर उतरला.
पाकिस्तानच्या उच्च क्रिकेट अधिकाऱ्यांनी या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं की स्पर्धेतून माघार घेण्याच्या निर्णयाचा देखील विचार करण्यात आला होता. पीसीबी प्रमुख मोहसिन नक्वी, त्यानंतर माजी पीसीबी प्रमुख नजम सेठी आणि रमीझ राजा यांनी पत्रकार परिषदेत सहभाग घेतला. जिथे अँडी पायक्रॉफ्ट यांना भारताचे आवडते सामनाधिकारी म्हणून वर्णन केले गेले.
तर सामना संपल्यानंतरच्या सादरीकरण समारंभात सूर्यकुमार यादवने दिलेल्या विधानावर आक्षेप घेण्यात आला, ज्यामध्ये त्याने पाकिस्तानविरुद्धचा विजय पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना आणि भारतीय सैन्याला समर्पित केला.
आशिया चषकावर बहिष्कार टाकणं मोठा निर्णय होता – मोहसीन नक्वी
पीसीबी प्रमुख मोहसीन नक्वी म्हणाले, “जसं तुम्हा सर्वांना ठाऊक आहे, १४ सप्टेंबरपासून हा वाद सुरू आहे. सामन्यातील रेफरी (अँडी पायकॉफ्ट) यांच्या भूमिकेबाबत आम्हाला आक्षेप होता. थोड्यावेळापूर्वी रेफरीने संघाचे प्रशिक्षक, कर्णधार आणि व्यवस्थापक यांच्याशी चर्चा केली. त्यांनी स्पष्ट सांगितलं की अशी घटना (हस्तांदोलन न होणं) घडायला नको होती. याआधीदेखील आम्ही आयसीसीकडे सामन्यादरम्यान झालेल्या आचारसंहितेच्या उल्लंघनाची चौकशी करण्याची मागणी केली होती.”
“राजकारण आणि खेळ हे वेगळेच राहायला हवेत, असं आमचं ठाम मत आहे. हा खेळ आहे, तो तसाच राहू द्या. क्रिकेटला या सगळ्यापासून दूर ठेवायला हवं. मी नजम सेठी आणि रमीज राजा यांनी विनंती केली होती. बहिष्कार घालणं हा अतिशय मोठा निर्णय होता. त्यामध्ये पंतप्रधान, सरकारी अधिकारी आणि इतर अनेक लोक सहभागी होते आणि त्यांचं आम्हाला पूर्ण समर्थन मिळालं. आम्ही या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून होतो.”
पायक्रॉफ्ट यांनी मागितली पाकिस्तानची माफी – नजम सेठी
“पीसीबीचं उद्दिष्ट नेहमी एकच राहिलं आहे, खेळात राजकारण येऊ नये. मी स्वतः अध्यक्ष होतो तेव्हाही हेच उद्दिष्ट होतं आणि आजही तेच आहे. त्यांनी राजकारण केलं, आम्ही नाही. आम्ही माफीची मागणी केली होती आणि ती माफी मिळाली आहे. विजेता ठरलंय क्रिकेटच. जग आमच्या भूमिकेला पाठिंबा देतंय आणि भारताच्या भूमिकेवर जगाची प्रतिक्रिया तुम्ही सगळे पाहत आहात.”, असं नजम सेठी यांनी सांगितलं.
सूर्यकुमार यादवच्या वक्तव्यावर सर्वात मोठा आक्षेप – रमीझ राजा
“गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती, जिथे भावना महत्त्वाच्या होत्या. पण मला आनंद आहे की आपण भावनेच्या भरात असा काही निर्णय घेतला नाही ज्यामुळे क्रिकेटला धक्का बसला असता, जे खूप महत्त्वाचं आहे. आता या क्रिकेट संघाने बोलणं कमी करून खेळातूनच उत्तर द्यावं आणि कहाणी पुढे न्यायची आहे. ज्या भावना तुम्ही अनुभवल्या, त्या मैदानावर दाखवा आणि जगाला दाखवा आपण किती मोठे क्रिकेट राष्ट्र आहोत. माझ्यासाठी सर्वात मोठी आक्षेपार्ह गोष्ट म्हणजे सामना संपल्यानंतरच्या सादरीकरणात (भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव याने) केलेलं वक्तव्य. तोच खरा तर निर्णायक मुद्दा होता.”
अँडी पायक्रॉफ्ट भारताचे आवडते मॅच रेफरी – रमीझ राजा
“जर मॅच रिफरीने माफी मागितली असेल तर ते चांगलं आहे. कारण क्रिकेट म्हणजे क्रिकेटच असलं पाहिजे, नाहीतर याला काही अर्थ नाही. मोहसीन नक्वी यांनी सांगितल्याप्रमाणे चौकशी होणार आहे, जेणेकरून अशा गोष्टी पुन्हा घडू नयेत. पण एक गंमतीशीर मुद्दा म्हणजे अँडी पायक्रॉफ्ट हा भारताचा आवडता मॅच रिफरी आहे. मी जेव्हा कधी कमेंट्रीसाठी किंवा नाणेफेकीला जातो, तेव्हा मला वाटतं की पायक्रॉफ्ट भारताच्या सामन्यांचा कायमस्वरूपी भाग आहे. कारण तो भारताच्या सामन्यांत तब्बल ९० वेळा मॅच रेफरी राहिला आह्, हे खूप एकतर्फी वाटतं, असं होऊ नये. हे एक तटस्थ व्यासपीठ आहे. आता तरी शहाणपणाने निर्णय होतील अशी मला आशा आहे.”