Pakistan Cricket Board: आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानचा संघ क्रिकेटमुळे कमी आणि वादामुळे जास्त चर्चेत आहे. रविवारी दुबईच्या मैदानावर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन न करताच ड्रेसिंग रूमचं दार लावून घेतलं होतं. हे पाकिस्तानच्या खेळाडूंना मुळीच आवडलं नव्हतं. त्यामुळे रुसलेल्या पाकिस्तानने आयसीसीकडे तक्रार केली. पण आयसीसीनेही निकाल त्यांच्या विरोधात दिला. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांना स्पर्धेबाहेर करा नाहीतर आम्ही स्पर्धेवर बहिष्कार टाकू अशी पोकळ धमकी दिली होती. आयसीसीने पीसीबीच्या विरोधात निकाल देत ही मागणी फेटाळून लावली. पण पाकिस्तानने काही स्पर्धेतून माघार घेतलेली नाही. दरम्यान पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख मोहसीन नक्नी यांनी स्पर्धेतून माघार न घेण्यामागचं कारण सांगितलं आहे.
पाकिस्तानने यावेळीही दिलेला शब्द पाळला नाही आणि स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय बदलला. नक्वी म्हणाले, स्पर्धेवर बहिष्कार टाकणं हा खूप मोठा निर्णय होता. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि इतर सरकारी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर बहिष्कार टाकण्याचा निर्णय मागे घेण्यात आला.
मोहसीन नक्वी म्हणाले, “१४ सप्टेंबरपासून वाद पेटला आहे, हे तुम्हाला चांगलच माहीत आहे. सामनाधिकाऱ्यांनी (अँडी पायक्रॉफ्ट) यांनी घेतलेल्या भूमिकेवर आम्ही आक्षेप घेतला होता. थोड्या वेळापूर्वी सामनाधिकाऱ्यांनी संघाचा कर्णधार, प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापकांशी चर्चा केली. त्यांनी स्पष्ट सांगितलं की, अशी घटना (हस्तांदोलन) घडायला नको होती. याआधीही आम्ही आयसीसीकडे सामन्यादरम्यान झालेल्या आचारसंहितेच्या उल्लंघनाची चौकशी करण्याची मागणी केली होती.”
तसेच ते पुढे म्हणाले, “मी सेठी साहेब आणि रमीज राजा यांना विनंती केली होती. जर आम्हाला बहिष्कार टाकायचा होता, जो खूप मोठा निर्णय होता. आम्हाला पंतप्रधान, सरकारी अधिकारी आणि इतर अनेक जणांचा पाठिंबा मिळाला. आम्ही सर्व या प्रकरणावर लक्ष ठेवून होतो.” भारत- पाकिस्तान सामन्यादरम्यान नाणेफेक झाल्यानंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने हस्तांदोलन करणं टाळलं होतं. त्यानंतर सामना झाल्यानंतर भारतीय खेळाडू हस्तांदोलन न करताच ड्रेसिंग रूममध्ये निघून गेले होते. यावरून पाकिस्तान क्रिकेट बोर्डने आयसीसीकडे अँडी पायक्रॉफ्ट यांची तक्रार केली होती. पण आयसीसीने अँडी पायक्रॉफ्ट यांच्या बाजूने निकाल दिला आहे.