Hardik Pandya Luxurious Watch Price: आशिया चषक २०२५ ला आज ९ सप्टेंबरपासून सुरूवात आहे. आशिया चषकाचे सर्व सामने दुबईत खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेच्या सरावाकरता भारतीय संघ ४ सप्टेंबरला दुबईमध्ये पोहोचला. युएईविरूद्ध सामन्याने भारतीय संघ स्पर्धेच्या मोहिमेला सुरूवात करेल. पण तत्पूर्वी भारताच्या सराव सत्रादरम्यान हार्दिक पंड्याने घातलेलं घड्याळ सध्या व्हायरल होत आहे. या घड्याळाची किंमत आशिया चषकाच्या बक्षीसाच्या रकमेपेक्षा सातपटीने जास्त आहे.
आशिया चषकापूर्वी भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या चर्चेत आहे. हार्दिक पांड्याने आशिया चषकापूर्वी नवीन हेअरकट केला आहे. यावेळी त्याने आपल्या केसांना सँडी ब्लॉन्ड रंग केला आहे. या नवीन लूकमुळे हार्दिकचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. भन्नाट फॅशन, हेअरस्टाईल आणि आपल्या लुक्समुळे पंड्या चर्चेत असतो. आता त्याच्या घड्याळामुळे हार्दिकचं सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
सराव सत्रादरम्यान, हार्दिक रिचर्ड मिल आरएम २७-०४ घड्याळ घालून मैदानावर उतरला होता. हे अतिदुर्मिळ घड्याळ असून फार मोजक्या जणांकडे या कंपनीचं घड्याळ आहे. या घड्याळाची किंमत ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
हार्दिकने शनिवारी इन्स्टाग्रामवर सरावाचे फोटो शेअर केले. त्याच्या कॅप्शनमध्ये त्याने बॅक टू बिझनेस असं लिहिले. त्याच पोस्टमध्ये जगातील सर्वात महागड्या घड्याळांपैकी एक असलेलं रिचर्ड मिल हे घड्याळ त्याच्या हातात दिसत होतं. रिपोर्ट्सनुसार, जगात फक्त ५० लोकांकडे हे घड्याळ आहे.
हार्दिक पंड्याच्या घड्याळाची किती आहे किंमत?
हार्दिकच्या मनगटावर असलेल्या घड्याळाची किंमत तब्बल २० कोटी आहे. तर आशिया चषकाच्या बक्षीसाची रक्कम २.६ कोटी रूपये आहे. म्हणजेच हार्दिकच्या घड्याळाची किंमत बक्षीसाच्या रकमेपेक्षा ७ पटीने जास्त आहे.


हार्दिकने घातलेलं घड्याळ रिचर्ड मिल आरएम २७-०४ आहे. एका वेबसाइटनुसार, त्याची किंमत २२५०००० अमेरिकन डॉलर्स म्हणजेच सुमारे २० कोटी रुपये आहे. हे घड्याळ खास स्पेनचा महान टेनिसपटू राफेल नदालसाठी बनवण्यात आलं होतं. या घड्याळाचं वजन फक्त ३० ग्रॅम आहे. १२,००० ग्रॅमपेक्षा जास्त फोर्सचा दाब सहन करण्याची क्षमता या घड्याळात आहे. रिचर्ड मिल आरएम घड्याळ फक्त ५० लोकांसाठी बनवण्यात आलं आहे.