Suryakumar Yadav Trolled on Social media: भारताच्या टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आशिया चषकाच्या पत्रकार परिषदेदरम्यान एका वेगळ्याच वादात अडकला आहे. चाहते सोशल मीडियावर सूर्याला बोल लावत असून त्याला ट्रोल केलं जात आहे. आशिया चषक २०२५ पूर्वी सुरू होण्यापूर्वी सर्व संघांचे कर्णधार पत्रकार परिषदेसाठी पोहोचले होते. पण यादरम्यान असं काही घडलं की आता सूर्यकुमार यादव चाहत्यांच्या निशाण्यावर आला आहे.
आशिया चषकाच्या सुरुवातीच्या पत्रकार परिषदेपूर्वी, सूर्या आशिया क्रिकेट काऊन्सिल आणि पीसीबी प्रमुख मोहसीन नक्वी यांच्याशी हस्तांदोलन केलं आणि आता हा चर्चेचा मोठा विषय ठरला आहे. सोशल मीडियावर भारतीय टी-२० कर्णधाराला शिवीगाळ केली जात आहे.
सूर्यकुमार यादवला आशिया चषकापूर्वी चाहत्यांनी केलं ट्रोल
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सूर्याने त्यांना हस्तांदोलन करायला नको होतं, असं अनेक चाहत्यांचं मत आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात अनेक भारतीयांना आपला जीव गमावावा लागला होता आणि त्यानंतर ऑपरेशन सिंदूर करण्यात आले होते. यानंतर आशिया चषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानविरूद्ध सामन्यावर बंदी घालावी, अशी मागणी देखील करण्यात आली. पण सरकारने मात्र भारतीय संघाला आशिया चषकात खेळण्यासाठी परवानगी दिली.
सूर्यकुमार यादव आणि पीसीबी प्रमुख मोहसीन नक्वी यांच्यातील हस्तांदोलनाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पत्रकार परिषदेदरम्यान मोहसीन नक्वी यांनी आशिया चषकाच्या ट्रॉफीचं अनावरण करतानाही त्यांनी सूर्यकुमार यादवला हात मिळवला. दरम्यान पत्रकार परिषदेपूर्वी सूर्यकुमार यादवने मोहसीन नक्वी हसत हसत हात मिळवतानाचा फोटोदेखील व्हायरल होत आहे.
सूर्यकुमार यादवचे हे व्हायरल होत असलेले फोटो पाहून चाहते त्याच्यावर प्रचंड संतापले आहेत. सूर्यकुमार तुला लाज वाटली पाहिजे असही चाहते म्हणत आहेत. अजून एकाने लिहिलं आहे की, ते लोक आपल्या निष्पाप लोकांचा जीव घेतात आणि तुम्ही त्यांच्याशी हात मिळवताय. हे खूपचं लाजिरवाणं आहे. मोहसीन नक्वी फक्त पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नाही तर पाकिस्तानचे गृहमंत्री देखील आहेत. ज्यांनी ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताला धमकी दिली होती.
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानी कर्णधार सलमान अली आघाबरोबर हस्तांदोलन केलं नाही अशा बातम्या आल्या होत्या, परंतु आता सोशल मीडियावर काही फोटो व्हीडिओ व्हायरल होत आहेत, त्यानुसार सूर्याने सलमान अली आघाबरोबरही हात मिळवताना दिसला. सूर्या स्टेजवरून खाली उतरताना त्याने सलमानशी हस्तांदोलन केलं. आता सूर्यकुमार यादवला या मुद्द्यावरून चाहते खूप ट्रोल करत आहेत.