Washington Sundar, County Championship: आशिया चषक २०२५ स्पर्धेला सुरूवात झाली आहे. भारतीय संघाने पहिल्या सामन्यात यूएईचा दमदार पराभव केला. भारतीय संघाचा पुढील सामना येत्या १४ सप्टेंबरला पाकिस्तानविरूद्ध होणार आहे. या स्पर्धेसाठी राखीव खेळाडू म्हणून निवड झालेल्या वॉशिंग्टन सुंदरने काऊंटी चॅम्पियनशिप स्पर्धेत हॅम्पशायर संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे. तो हंगामातील शेवटच्या दोन सामन्यात समरसेट आणि सरेविरूद्ध होणाऱ्या सामन्यात हॅम्पशायर संघाकडून खेळताना दिसणार आहे. हॅम्पशायरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.
इंग्लंडविरूद्ध केली होती दमदार कामगिरी
वॉशिंग्टन सुंदरला इंग्लंडविरूद्ध झालेल्या भारतीय संघात संधी दिली गेली होती. या मालिकेत त्याच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला होता. या मालिकेत त्याने ४७ च्या सरासरीने फलंदाजी करताना २८४ धावा केल्या होत्या. या मालिकेतील चौथ्या कसोटीत त्याने दमदार शतक झळकावलं होतं. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील पहिलं शतक ठरलं. ही कामगिरी पाहून त्याला काऊंटी चॅम्पियनशिप खेळण्याची संधी दिली गेली आहे.
वॉशिंग्टन सुंदर हा दुसऱ्यांदा काऊंटी चॅम्पियनशिप स्पर्धा खेळताना दिसणार आहे. याआधी तो २०२२ मध्ये लंकाशायर संघाकडून खेळताना दिसून आला होता. या संघाकडून तो वनडे कप खेळताना दिसून आला होता. वॉशिंग्टन सुंदरआधी तिलक वर्माचा हॅम्पशायर संघात समावेश करण्यात आला होता. वॉशिंग्टन सुंदरच्या कामगिरीबद्दल सांगायचं झालं, तर त्याला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ४० सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. ज्यात १३ कसोटी सामन्यांचा समावेश आहे. यादरम्यान त्याने १८०० हून अधिक धावा केल्या आहेत. गोलंदाजी करताना त्याने ९१ गडी बाद केले आहेत. यादरम्यान ५९ धावा करून ७ गडी बाद ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
वॉशिंग्टन सुंदरला हॅम्पशायर संघाकडून २ सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. वॉशिंग्टन सुंदरसाठी पुढील दोन्ही सामन्यांमध्ये तगडं आव्हान असणार आहे. हॅम्पशायरचा संघ या स्पर्धेत संघर्ष करताना दिसतोय. हा संघ गुणतालिकेत आठव्या स्थानी आहे. या संघाचा पुढील सामना १५ ते १८ सप्टेंबरपर्यंत समरसेट संघाविरूद्ध होणार आहे. तर पुढील सामना २४ ते २७ सप्टेंबरला सरेविरुद्ध होणार आहे.