Who is Simranjeet Singh IND vs UAE Asia Cup 2025: भारतीय संघ युएईविरूद्ध सामन्याने आशिया चषक स्पर्धेच्या मोहिमेला सुरूवात करणार आहे. भारताची या सामन्यासाठी प्लेईंग इलेव्हन कशी असणार यावर सर्वांच्या नजरा आहेत. दरम्यान युएईचा संघ प्रथमच आशिया चषक खेळण्यासाठी उतरला आहे. यामध्ये काही भारतीय वंशाचे खेळाडूदेखील आहेत. त्यापैकी एका गोलंदाजाने शुबमन गिलबरोबरची त्याची आठवण सांगितली आहे.

युएईच्या ताफ्यात अनेक भारतीय वंशाचे खेळाडू आहेत. ज्यामध्ये सिमरनजीत सिंगदेखील खेळताना दिसणार आहे. जो मूळचा पंजाब लुधियाना येथील आहे. युएईकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यापूर्वी तो पंजाबकडून क्रिकेट खेळला आहे. त्याने भारताचा कसोटी कर्णधार शुबमन गिलबरोबरची त्याची आठवण सांगितली आहे.

या सामन्यापूर्वी, यूएईचा डावखुरा फिरकी गोलंदाज सिमरनजीत सिंग शुबमन गिलला लहानपणापासून ओळखतो. ३५ वर्षीय सिमरनजीत सिंग म्हणाला, “मी शुबमनला तो लहान असल्यापासून ओळखतो, पण तो मला आता ओळखत असेल नाही कल्पना नाही. ही २०११-१२ ची गोष्ट आहे. तो पण तेव्हा ११-१२ वर्षांचा असेल. आम्ही सकाळी ६ ते ११ दरम्यान पंजाब क्रिकेट अकादमीमध्ये सराव करायचो आणि त्यावेळेस शुबमन त्याच्या वडिलांबरोबर यायचा. मी अतिरिक्त वेळ गोलंदाजीसाठी थांबायतो आणि तेव्हाच मी बरेचदा त्याला नेट्समध्ये गोलंदाजी केली आहे.”

कोण आहे सिमरनजीत सिंग?

३५ वर्षीय सिमरनजीत सिंग हा पंजाबकडून क्रिकेट खेळला आहे. २०१७ मध्ये फिरकीपटू असलेला सिमरनजीत पंजाबच्या रणजी संघाचा भाग होता, पण तो भारतीय संघात स्थान मिळवण्यात अपयशी ठरला. २० दिवसांच्या प्रशिक्षण सत्रासाठी दुबईला गेल्यानंतर त्याच्या क्रिकेट प्रवासाला कलाटणी मिळाली. कोरोनामुळे तो युएईमध्ये अडकला आणि तात्पुरत्या प्रवासाची सुरुवात एका नवीन सुरुवातीत झाली.

“मी एप्रिल २०२१ मध्ये २० दिवस सरावासाठी आलो होतो. पण भारतात करोनाची दुसरी लाट आल्याने लॉकडाऊन लागलं आणि मी परतू शकलो नाही आणि मग इथेच राहिलो.”, असं तो पुढे म्हणाला. क्लब क्रिकेट खेळताना स्वतःचा खर्च भागवण्यासाठी त्याने ज्युनिअर खेळाडूंना कोचिंग देण्यास सुरुवात केली. यूएईसाठी पात्र होण्यासाठी लागणारी तीन हंगामांची देशांतर्गत अट पूर्ण केल्यानंतर त्याने राष्ट्रीय प्रशिक्षक ललचंद राजपूत यांच्याशी संपर्क साधला.

कोच राजपूत यांनी तो एक ‘चतुर’ गोलंदाज असल्याचं म्हटलं आहे. आतापर्यंतच्या १२ टी२० सामन्यांत त्याने १५ बळी घेतले असून त्याचा इकोनॉमी रेट सहाच्या आत आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात त्याने २४ धावांत १ विकेट घेतली आणि तब्बल ११ चेंडू डॉट टाकले.

सिमरनजीत पुढे म्हणाला, यूएईने त्याला आपला धर्म पाळण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे. “हा एक उत्तम देश आहे. माझ्या दाढीवर, कड्यावर किंवा किरपानवर कोणीही कधी प्रश्न उपस्थित केला नाही.” यूएईचा सामना भारताविरूद्ध आहे तर मग तुझं कुटुंब कोणाला पाठिंबा देईल, यावर तो हसत म्हणाला, “हा खूप अवघड प्रश्न आहे. स्वप्न भारतासाठी खेळण्याचं होतं, पण आता मी यूएईसाठी खेळतोय, त्यामुळे ते बहुतेक यूएईलाच पाठिंबा देतील.”