Who is UAE Coach Lalchand Rajput: आशिया चषक २०२५ मध्ये भारतीय संघ आज १० सप्टेंबरला युएईविरूद्ध पहिला सामना खेळणार आहे. हा सामना दुबई इंटरनॅशनलमध्ये स्टेडियममध्ये खेळवला जाईल. दुबईमध्ये स्पर्धा होत असल्याने युएईसाठी घरच्या मैदानावर ही स्पर्धा आहे. दरम्यान युएई संघाचे प्रशिक्षक हे भारताच्या २००७ मधील टी-२० विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होते, पाहूया कोण आहेत लालचंद राजपूत.

युएईचा संघ प्रथमच आशिया चषक खेळताना दिसणार आहे. तर भारतीय संघ हा या स्पर्धेचा चॅम्पियन संघ आहे. टीम इंडियाने आतापर्यंत विक्रमी ८ वेळा या स्पर्धेचं जेतेपद पटकावलं आहे. युएईचा संघ मोहम्मद वसीमच्या नेतृत्त्वाखाली ही स्पर्धा खेळणार आहे. तर लालचंद राजपूत हे या संघाचे कोच आहेत.

लालचंद राजपूत हे फेब्रुवारी २०२४ पासून युएई संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत. आशियाई क्रिकेट परिषदेच्या प्रीमियर कप २०२४ मध्येही मोहम्मद वसीम आणि लालचंद राजपूत यांचं नेतृत्त्व व मार्गदर्शनाखाली संघाने विजय मिळवला. युएईने तब्बल ९ वर्षांनी आशिया चषकासाठी पात्रता मिळवली आहे. संघ अखेरचा २०१६ मध्ये आशिया चषक खेळला होता.

कोण आहेत लालचंद राजपूत?

मुंबई क्रिकेटमधून घडलेले लालचंद राजपूत हे भारताच्या देशांतर्गत क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू आहेत. राजपूत यांनी एक सर्वाेत्तम सलामीवीर म्हणून ओळख तयार केली. त्यांनी एकूण ११० प्रथमश्रेणी सामने खेळले असून ४९.३० च्या सरासरीने ७९८८ धावा केल्या आहेत, ज्यात २० शतकांचा समावेश आहे.

राजपूत २० ऑगस्ट १९८५ मध्ये भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यांनी १९८५ मध्ये श्रीलंकेविरुद्ध भारताकडून दोन कसोटी सामने खेळले होते, ज्यात त्यांनी अर्धशतक झळकावलं होतं. १९८५ ते १९८७ दरम्यान त्यांनी भारतासाठी चार एकदिवसीय सामनेही खेळले. इंग्लंडविरूद्ध सामन्यात त्यांनी २३ जानेवारी १९८५ मध्ये पदार्पण केले होते.

लालचंद राजपूत यांनी भारताकडून वनडे आणि कसोटीत केलं पदार्पण

भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळले असले तरी मात्र प्रशिक्षक म्हणूनच राजपूत यांनी आपलं नाव कमावलं. २००७ मध्ये इंग्लंड दौर्‍यासाठी भारताच्या अंडर-१९ संघाचे प्रशिक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि त्यातूनच त्यांचा प्रशिक्षक म्हणून प्रवास सुरू झाला.

नंतर २००७ मध्ये ग्रेग चॅपल यांचा कार्यकाळ संपल्यानंतर आणि २००८ मध्ये गॅरी कर्स्टन यांची नियुक्ती होईपर्यंत भारतीय संघात मुख्य प्रशिक्षकपदी कोणी नव्हतं. त्यादरम्यान राजपूत यांची संघाच्या मॅनेजरपदी नियुक्ती झाली होती, जी प्रत्यक्षात तात्पुरत्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिकाच होती.

UAE Coach Lalchand Rajput
युएई संघाचे कोच लालचंद राजपूत (फोटो-X)

एम.एस. धोनीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने २००७ मधील पहिल्याच टी२० विश्वचषकात अविश्वसनीय कामगिरी करून विजेतेपद पटकावलं. त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौर्‍यावरही राजपूत यांनी संघाची धुरा सांभाळली होती. त्या मालिकेत झालेल्या ‘मंकीगेट’ वादामध्ये त्यांनी निभावलेली भूमिका विशेष कौतुकास्पद ठरली. याच दौर्‍यावर भारताने ऐतिहासिक असा २००८ चा सीबी मालिका विजय मिळवला.

भारत सोडून या संघांचं कोच म्हणून केलंय काम

२००८ मध्ये झालेल्या पहिल्याच इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) हंगामात राजपूत यांची मुंबई इंडियन्स (एमआय) संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाली होती. यानंतर राजपूत यांनी २०१६ मध्ये इंझमाम-उल-हक यांच्या जागी अफगाणिस्तान क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी सांभाळली आणि तब्बल एक वर्ष त्या पदावर कार्यरत होते. त्यानंतर २०१८ ते २०२२ या कालावधीत जवळपास चार वर्षे ते झिम्बाब्वे संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. मागील वर्षी त्यांनी यूएई संघाचे प्रशिक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारली.