पुढील महिन्यात होणाऱ्या महिलांच्या आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेसाठी कर्णधार राणी रामपालला विश्रांती देण्यात आली असून, उपकर्णधार सविताकडे १८ सदस्यीय भारतीय संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.

डोंगहे (दक्षिण कोरिया) येथे ५ ते १२ डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेत चीन, कोरिया, जपान, थायलंड आणि मलेशिया या संघांचा समावेश आहे. राणी बेंगळूरु येथे दुखापतीतून सावरत असून अनुभवी बचावपटू दीप ग्रेस एक्काची उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत चौथ्या क्रमांकापर्यंत मजल मारणाऱ्या भारतीय संघातील बचावपटू लालरेम्सियामी, शर्मिला देवी, मध्यरक्षक सलिमा टेटे या तिघींना चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.

’ संघ : सविता (कर्णधार), रजनी ईटिमार्पू, दीप ग्रेस एक्का, उदीता, निक्की प्रधान, गुर्जित कौर, निशा, सुशिला चानू पुखरम्बाम, नमिता टोप्पो, मोनिका, नेहा, ज्योती, लिलिमा मिन्झ, नवनीत कौर, वंदना कटारिया, रर्जंवदर कौर, मिरयाना कुजूर, सोनिका.