एकेरीच्या उपांत्य फेरीत तिघेही पराभूत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्क्वॉशच्या एकेरीमध्ये उपांत्य फेरीत पराभूत झाल्यामुळे भारताच्या दीपिका पल्लीकल-कार्तिक, जोश्ना चिनप्पा आणि सौरव घोषाल यांना आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

उपांत्य फेरीत २०१४च्या आशियाई स्पर्धेत कांस्यपदक जिंकणाऱ्या दीपिकाला निकोल डेव्हिडकडून ०-३ (७-११, ९-११, ६-११) अशा फरकाने पराभव पत्करावा लागला. काही वर्षांपूर्वी जागतिक स्क्वॉश क्रमवारीतील अग्रस्थान आपल्या नावावर असणाऱ्या डेव्हिडच्या खात्यावर चार आशियाई विजेतेपदे आहेत. दुसऱ्या उपांत्य सामन्यात जोश्नाची वाटचाल मलेशियाच्याच १९ वर्षीय सिवासांगारी सुब्रमण्यमने रोखली. सिवासांगारीने जोश्नाचा ३-१ (१२-१०, ११-६, ११-९, ११-७) असा पराभव केला.

मागील आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक जिंकणाऱ्या सौरवला हाँगकाँगच्या च्यूंग मिंग ऊ याने नमवले. च्यूंगने अग्रममानांकित सौरवचा १०-१२, ११-१३, ११-६, ११-६, ११-६ असा पराभव केला. कांस्यपदकासाठी अतिरिक्त सामना नसल्यामुळे उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या दोन्ही खेळाडूंना कांस्यपदक दिले जाते.

पराभवाबाबत मी कोणतेही कारण देणार नाही. परंतु मला त्याचे फार दु:ख झाले आहे. च्यूंगविरुद्धच्या सामन्यासाठी एकाग्रता अतिशय महत्त्वाची होती. मात्र दुसऱ्या सेटमध्ये मी गमावली. परंतु दोन सेट गमावल्यानंतरही च्यूंगने दिलेली झुंज वाखाणण्याजोगी होती.   – सौरव घोषाल

निकोल अनुभवी खेळाडू असून, परिस्थिती हाताळण्याचे गुण तिच्यात आहेत. चपळाई, हालचाली आणि सावधगिरी ही तिची वैशिष्टय़े आहेत. त्यामुळेच गेली दहा वर्षे ती जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. माझा खेळ चांगला झाला, याचेच मला समाधान आहे.   – दीपिका पल्लीकल

पंचांची कामगिरी समाधानकारक नव्हती. सिवासांगारीने अप्रतिम खेळाचे प्रदर्शन केले. मी तिसऱ्यांदा आशियाई क्रीडा स्पर्धेत यंदा सहभागी झाले. परंतु प्रथमच पदक जिंकू शकले. याची मी गेली अनेक वर्षे प्रतीक्षा करीत होती.    – जोश्ना चिनप्पा

राष्ट्रकुल विजेत्या अनिशकडून निराशा

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा भारताचा १५ वर्षीय नेमबाज अनिश भानवाला आशियाई क्रीडा स्पर्धेत अपेक्षित कामगिरी करण्यात अपयशी ठरला. त्यामुळे पुरुषांच्या २५ मीटर रॅपिड फायर एअर पिस्तूल प्रकारात तो पदकापासून वंचित राहिला.

राष्ट्रकुलमध्ये सोनेरी इतिहास घडवणाऱ्या अनिशला आशियाई स्पर्धेत त्याची पुनरावृत्ती करता आली नाही. एकूण ५७६ गुण कमावणाऱ्या अनिशला नववा क्रमांक मिळाल्यामुळे अंतिम फेरी गाठता आली नाही. या प्रकारात सहभागी झालेला भारताचा आणखी एक नेमबाज शिवम शुक्ला (५६९ गुण) याला ११वा क्रमांक मिळाला. पात्रता फेरीतील अव्वल सहा जण अंतिम फेरीसाठी पात्र ठरले.

१६ वर्षीय सौरभ चौधरी आणि १५ वर्षीय शार्दूल विहान यांनी आशियाई स्पर्धेत आपली छाप पाडली असताना मनू भाकर आणि अनिश मात्र आपला प्रभाव पाडू शकले नाहीत. भारताने आतापर्यंत नेमबाजीत नऊ पदके जिंकली आहेत. यात चौधरी आणि राही सरनोबत यांच्या पिस्तूल प्रकारातील सुवर्णपदकांचा समावेश आहे.

महिलांच्या स्कीट पात्रता फेरीत गॅनेमोट सेखॉन आणि रश्मी राठोड यांना अनुक्रमे नवव्या आणि १०व्या स्थानावर समाधान मानावे लागले. याचप्रमाणे पुरुषांच्या स्कीट पात्रता फेरीत शीराझ शेख आणि अंगड वीर सिंग बाजवा यांना अनुक्रमे १०वे आणि १३वे स्थान मिळाले.

माझे नेम चुकले. असे कधी तरी घडते. मी निराश झालो असलो, तरी पुढील आव्हानांसाठी लवकरच सज्ज होईन.    -अनिश भानवाला

तिरंदाजांची पाटी कोरी

भारताच्या रीकव्‍‌र्ह तिरदांजांची आशियाई क्रीडा स्पर्धेमधील पाटी कोरी राहिली. सांघिक प्रकारात पुरुष आणि महिला दोन्ही संघांचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले.

वैयक्तिक रीकव्‍‌र्ह प्रकारातील निराशाजनक कामगिरीनंतर भारताच्या आशा सांघिक चमूवर होत्या. भारतीय महिला संघाने चायनीज तैपेईकडून २-६ असा पराभव पत्करला. अंकिता भाकत, प्रमिला दैमारी आणि दीपिका कुमारी यांचा समावेश असलेल्या भारताचा चायनीज तैपेईच्या चीन-यिंग लेई, चिआ-माओ पेंग आणि यॅटिंग टेन यांनी हरवले.

पुरुष रीकव्‍‌र्ह प्रकारात भारताला विजेतेपदाचे दावेदार कोरियाकडून १-५ असा पराभव पत्करावा लागला. भारताच्या चमूत जगदीश चौधरी, अतानू दास आणि विश्वास यांचा समावेश होता, तर कोरियाच्या संघात वूजिन किम, वूसीओक ली आणि जिनोक ओह सामील होते.

भारताची दोन पदके निश्चित

आशियाई क्रीडा स्पर्धेत यंदा प्रथमच स्थान मिळवणाऱ्या ब्रिज क्रीडा प्रकारात भारताने दोन पदके निश्चित केली आहेत. पुरुष सांघिक आणि मिश्र सांघिक गटात भारताने उपांत्य फेरी गाठली आहे. पात्रता फेरीनंतर पुरुष संघाने चौथे आणि मिश्र संघाने दुसरे स्थान मिळवले आहे.

भारताच्या पुरुष संघात जग्गी शिवदासानी, राजेश्वर तेवारी, अजय खरे, राजू तोलानी, देवव्रत मजूमदार आणि सुमित मुखर्जी यांचा समावेश आहे. याचप्रमाणे मिश्र संघात किरण नाडर, हेमा देवरा, हिमानी खंडेलवाल, बशीराजू सत्यनारायण, गोपीनाथ मन्ना व राजीव खंडेलवाल यांचा समावेश आहे. भारताच्या पुरुष संघातील खेळाडूंचे सरासरी वय ५२ वर्षे आहे, तर मिश्र संघातील खेळाडूंचे सरासरी वय ५७ वर्षे आहे.

 

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asian games 2018 dipika pallikal joshna chinappa saurav ghosal
First published on: 26-08-2018 at 01:56 IST