आशियाई खेळांमध्ये महिलांच्या ५० किलो वजनी गट कुस्तीत भारताच्या विनेश फोगाटने सुवर्णपदकाची कमाई केली. अंतिम फेरीत विनेशने जपानच्या युकी आईरीवर मात केली. या विजयासह विनेश आशियाई खेळांमध्ये कुस्तीमध्ये सुवर्णपदक मिळवणारी पहिली महिला खेळाडू ठरली. पहिल्या डावात विनेशने बेसावध असलेल्या जपानच्या आईरीला चितपट करण्याचा प्रयत्न केला. विनेशचा हा प्रयत्न अयशस्वी झाला असला तरीही यातून तिने ४ गुणांची कमाई करत आघाडी मिळवली. मात्र दुसऱ्या डावात अखेरच्या सेकंदांमध्ये विनेशने जपानच्या प्रतिस्पर्धी खेळाडूला चीतपट करत सामना आपल्या नावावर केला. याआधी कुस्तीत भारताला बजरंग पुनियाने सुवर्णपदक मिळवून दिले होते. आशियाई खेळांच्या दुसऱ्या दिवशीही भारतीय नेमबाजांनी पदकं मिळवण्याचा सपाटा सुरुच ठेवला आहे. पुरुषांच्या ट्रॅप नेमबाजीत भारताच्या लक्ष्य शेरॉनने रौप्य पदकाची कमाई केली आहे. आजच्या दिवसातलं भारताचं नेमबाजीतलं हे दुसरं पदक ठरलं आहे. भारताच्या मानवजीत सिंह संधूने ट्रॅप नेमबाजीची अंतिम फेरी गाठली होती. मात्र पदकांच्या शर्यतीमधून त्याला बाहेर पडावं लागलं. लक्ष्यने मात्र संयमी खेळ करत अंतिम दोघांमध्ये आपलं स्थान कायम राखत, भारताला आणखी एका पदकाची कमाई करुन दिली. आजच्या दिवसातलं नेमबाजीमधलं भारताचं हे दुसरं रौप्यपदक ठरलं आहे. आज सकाळी दिपक कुमारने १० मी. एअर रायफल प्रकारात भारताला रौप्य पदकाची कमाई करुन दिली होती. त्यामुळे भारताची पदकांची संख्या एकूण ५ झाली असून त्यात २ सुवर्ण आणि ३ कांस्यपदकांचा समावेश आहे.