Mumbai Indians vs Kolkata Knight Riders Highlights: मुंबई इंडियन्स वि कोलकाता नाईट रायडर्स सामन्यात रोहित शर्मा प्लेईंग इलेव्हनचा भाग नव्हता, या सामन्यात रोहितला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळवण्यात आले होते. हार्दिकने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे या सामन्यात रोहित शर्मा फक्त फलंदाजीसाठी उतरला. मुंबई इंडियन्ससाठी प्लेऑफच्या दृष्टीने महत्त्वाच्या सामन्यात रोहित शर्माला संघाबाहेर ठेवले होते, ज्यावरून सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. पण आता पियुष चावलाने सामन्यानंतर रोहित शर्माला का खेळवलं नाही, यामागचं कारण सांगितलं आहे.

रोहित शर्मा आयपीएलमध्ये पहिल्यांदा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळला. या सामन्यात त्याने १२ चेंडूत केवळ ११ धावा केल्या. पण रोहित शर्माला या सामन्यात इम्पॅक्ट प्लेअर म्हणून का ठेवले, हा प्रश्न सर्वांना पडला होता. पण सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत पियुष चावलाने यामागचे कारण सांगितले.

रोहित शर्माला दुखापत?

जेव्हा पियुष चावला सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेत आला तेव्हा त्याने रोहित शर्माबद्दल एक मोठे अपडेट दिली. पियुष चावलाने पत्रकार परिषदेत सांगितले की, या सामन्यापूर्वी रोहित शर्माला पाठीच्या दुखापतीचा थोडा त्रास जाणवत होता, त्यामुळे व्यवस्थापनाने खबरदारी म्हणून त्याला क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरवले नाही.

रोहित शर्मा गेल्या काही काळापासून सतत क्रिकेट खेळत आहे. त्याने विश्रांतीही घेतली नाही. यंदाच्या टीम इंडियासाठीच्या सर्व मालिकांमध्येही रोहित खेळताना दिसला. अशा स्थितीत विश्वचषकापूर्वी रोहित शर्माच्या वर्कलोड मॅनेजमेंटसाठी हा निर्णय घेण्यात आला होता, जो आगामी सामन्यांमध्येही दिसण्याचीही शक्यता आहे. केकेआरविरूद्धच्या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचे प्लेऑफ गाठण्याचे आव्हान आता संपुष्टात आले आहे. संघाला जर तर आणि इतर संघांच्या गणितीय समीकरणांवर अवलंबून राहावे लागणार आहे. पण सर्वच निकाल मुंबईच्या बाजूने लागतील अशी शक्यता कमी आहे.