आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत महिलांच्या अंतिम सामन्यात पी. व्ही. सिंधूला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं आहे. चीन तैपेईच्या ताई त्झु यिंगने सिंधूवर २१-१३, २१-१६ अशी मात केली. सिंधू आणि यिंग यांच्यामध्ये सुरुवातीपासूनच यिंगचं पारडं जड होतं. आतापर्यंत यिंगने सिंधूला ९ वेळा पराभूत केलं आहे. सिंधूने रिओ ऑलिम्पिकमध्ये यिंगवर मात करुन अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता, मात्र या कामगिरीची पुनरावृत्ती करणं तिला जमलं नाही. अंतिम सामन्यात यिंगने सिंधूचा केलेला पराभव हा तिचा १० वा पराभव ठरला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उपांत्य फेरीत जपानच्या अकाने यामागुचीवर मात केलेली सिंधू अंतिम फेरीत चीन तैपेईच्या ताई त्झु यिंगला कडवी टक्कर देईल अशी अपेक्षा होती. मात्र पहिल्याच सेटमध्ये सिंधूला चांगलाच धक्का बसला यिंगने झटपट ५ गुणांची कमाई करत सिंधूला बॅकफूटवर ढकललं. सिंधूने वेळेत सावरत सेटमध्ये पुनरागमन केलं, मात्र यिंगची आघाडी कमी करण्यात तिला यश आलं नाही. यिंगच्या खेळात असलेल्या आक्रमकतेला सिंधूला तोंड देता आलं नाही. पहिल्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये चांगल्या रॅलीज रंगल्या, यामध्ये सिंधूने आपल्या उंचीचा फायदा घेत काही चांगल्या गुणांची कमाई केली. मात्र मध्यांतरापर्यंत यिंगने ११-७ अशी आघाडी घेतली होती. मध्यांतरानंतरही सिंधूने सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, मात्र यिंगने सिंधूला फारशी संधी न देता २१-१३ च्या फरकाने पहिला सेट जिंकला.

दुसऱ्या सेटमध्येही सिंधूने यिंगला चांगली टक्कर देण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या सेटच्या मध्यांतरापर्यंत सिंधूने सामन्यात पुनरागमन करत काही मॅचपॉ़ईंट वाचवले. मात्र यिंगने आपला सर्व अनुभव पणाला लावत २१-१६ च्या फरकाने दुसरा सेट जिंकत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. आजच्या दिवसातलं भारताचं हे तिसरं सुवर्णपदक ठरलं. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारी सिंधू पहिली भारतीय महिला ठरली होती, मात्र या सामन्यात सुवर्णपदक पटकावणं तिला जमलं नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asian games 2018 indonesia p v sindhu settle for silver as she loss final game against chines taipei opponent
First published on: 28-08-2018 at 12:53 IST