एटीपी फायनल्स  टेनिस स्पर्धा :- ग्रीकच्या स्टेफानोस त्सिसिपासने अंतिम फेरीत ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थिएमला पराभूत करून एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

ग्रीकच्या २१ वर्षीय त्सित्सिपासने रविवारी अंतिम फेरीत थिएमला ६-७ (६/८), ६-२, ७-६ (७-४) असा पराभव करून ही स्पर्धा सर्वात कमी वयात जिंकण्याचा बहुमान मिळवला. याअगोदर २००१ मध्ये लेटॉन हेविटने हा पराक्रम केला होता. त्सित्सिपासने यंदाच्या मोसमातील हे तिसरे विजेतेपद पटकावले आहे. त्सित्सिपासने सहा वेळचा विजेता रॉजर फेडररला उपांत्य सामन्यात सरळ फेरीत पराभूत केले होते.

‘‘मी आता माझ्या भावना शब्दांत व्यक्त करू शकत नाही. माझ्या आयुष्यात हे विजेतेपद नेहमीच लक्षात राहील. एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धेत विजेतेपद मिळवण्याचे माझे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे. या सामन्यात काही गुण माझ्याकडून चुकीच्या पद्धतीने गेल्यामुळे मी निराश झालो होतो; पण मी हे सगळे विसरून शेवटपर्यंत अधिक एकाग्रतेने खेळण्याचा प्रयत्न करत होतो. यंदाच्या वर्षांत एकूण पाच विजेतेपद पटकावणाऱ्या थिएमला पराभूत करता आल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे,’’ असे त्सिसिपासने सामना संपल्यानंतर सांगितले.