ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा एक डाव आणि १८२ धावांनी पराभव केली. या विजयाबरोबरच ऑस्ट्रेलियाने मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली आहे.यासह ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील विजयाचा १६ वर्षांचा दुष्काळही संपवला.
या विजयासह कांगारू संघाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतील आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात सलग ३ कसोटी मालिका गमावल्या होत्या. तसेच या बॉक्सिंग डे कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी, ऑफस्पिनर नॅथन लायन आणि वेगवान गोलंदाज स्कॉट बोलँड यांनी शानदार गोलंदाजी केली.
ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या डावात २०४ धावांत गुंडाळले. प्रोटीज संघाच्या टेंबा बावुमाने एक टोक सांभाळले असले, तरी दुसऱ्या टोकाकडून त्याला कोणतीही साथ मिळू शकली नाही. बावुमाने ६५ धावांची खेळी केली. पाहुण्या दक्षिण आफ्रिकेच्या संघावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३८७ धावांची आघाडी घेतली होती. मात्र प्रोटीज संघ १८२ धावांनी मागे राहिला.
नॅथन लायनने दुसऱ्या डावात ३ बळी घेतले –
ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात लायनने ३ तर स्कॉट बोलंडने २ बळी घेतले. तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावाच्या १८९ धावांच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने आपला पहिला डाव ८ बाद ५७५ धावांवर घोषित केला. दक्षिण आफ्रिकेने चौथ्या दिवशी १ बाद १५ धावांवर खेळ सुरू केला. त्याच्या दुसऱ्या डावात यष्टीरक्षक काइल व्हेरिनने ३३ धावा केल्या तर थ्युनिस डी ब्रायनने २८ धावांचे योगदान दिले. सलामीवीर सरेल इरवी २१ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
डेव्हिड वॉर्नर ठरला सामनावीर –
आपल्या १००व्या कसोटी सामन्यात द्विशतक झळकावणाऱ्या डेव्हिड वॉर्नरसाठी हा कसोटी सामना संस्मरणीय ठरला. वॉर्नरने पहिल्या डावात २५५ चेंडूत २०० धावा केल्या, तर यष्टीरक्षक अॅलेक्स कॅरीने कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथचे शतक १५ धावांनी हुकले. स्मिथ १६१ चेंडूत ८५ धावा करून बाद झाला. वॉर्नरला त्याच्या शानदार खेळीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.