Australia vs South Africa 3rd ODI: दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसरा सामना ग्रेट बॅरियर रीफ एरिनामध्ये पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी मैदानात आला. ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजी करताना मिचेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेड यांनी मोठा विक्रम मोडून काढला आहे. यासह दक्षिण आफ्रिकेवर मोठा विजय देखील मिळवला आहे.

मार्श आणि हेडच्या जोडीचा मोठा विक्रम

तिसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकून पहिल्या डावात फलंदाजी करताना सलामीवीर ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल मार्श यांनी दमदार फलंदाजी केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी २५० धावा जोडल्या. ही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना कुठल्याही संघाने पहिल्या विकेटसाठी केलेली सर्वात मोठी भागीदारी ठरली. याआधी इंग्लंडच्या मार्कस ट्रेस्कोथिक आणि विक्रम सोलंकी यांच्या जोडीने मिळून २०० धावांची भागीदारी केली होती. आता ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी हा मोठा विक्रम मोडून काढला आहे.

ऑस्ट्रेलियाचा दमदार विजय

या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ५० षटकांअखेर २ गडी बाद ४३१ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून सलामीला आलेल्या ट्रॅव्हिस हेडने १०३ चेंडूत १४२ धावांची खेळी केली. तर कर्णधार मिचेल मार्शने १०० धावा केल्या. दोघांनी मिळून २५० धावांची विक्रमी भागीदारी केली. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या कॅमेरून ग्रीनने ऑस्ट्रेलियाकडून खेळताना दुसरं सर्वात जलद शतक झळकावलं. त्याने ४७ चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. यादरम्यान त्याने ११८ धावांची खेळी केली. तर शेवटी ॲलेक्स कॅरीने नाबाद ५० धावा केल्या.

दक्षिण आफ्रिकेने मालिकेतील सुरवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये दमदार विजय मिळवला होता. मालिकेतील तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ४३२ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेकडून डेवाल्ड ब्रेव्हिसने सर्वाधिक ४९ धावांची खेळी केली. तर उर्वरित एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. दक्षिण आफ्रिकेचा डाव १५५ धावांवर आटोपला. यासह ऑस्ट्रेलियाने हा सामना २७६ धावांनी आपल्या नावावर केला.