SA vs AUS WTC Final 2025 Weather Forecast and Pitch Report: जागतिक कसोटी अजिक्यपद स्पर्धा (WTC) २०२५ चा बहुप्रतिक्षित अंतिम सामना आज म्हणजेच ११ जूनपासून सुरू होणार आहे. लंडनमधील ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात हा अंतिम कसोटी सामना खेळला जाणार आहे. गतविजेता ऑस्ट्रेलिया आपला किताब राखण्याचा प्रयत्न करेल, तर दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्यांदाच अंतिम फेरी खेळणार आहे. पण लंडनमधील हवामान कसं आहे आणि लॉर्ड्सचं पिच कसं असणार, याचा आढावा घेऊया.

ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा पराभव करत गतवर्षी WTC चे जेतेपद पटकावले होते. तर दक्षिण आफ्रिकेचा संघ या अंतिम सामन्यात विजय मिळवत आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करेल. दोन्ही संघांच्या कर्णधाराचे उत्कृष्ट रेकॉर्ड असून कोणत्या कर्णधाराचा दबदबा सरणार यावर सर्वांच्या नजरा आहेत.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने संघाचं नेतृत्त्व करताना कोणताच अंतिम सामना गमावलेला नाही. तर कर्णधार टेम्बा बावुमाच्या नेतृत्त्वाखाली दक्षिण आफ्रिकेने एकही कसोटी सामना गमावलेला नाही. त्यामुळे अंतिम सामना अटीतटीचा होणार आहे.

लॉर्ड्स पिच रिपोर्ट (SA vs AUS Pitch report)

क्रिकेटची पंढरी म्हटल्या जाणाऱ्या लंडनमधील लॉर्ड्सच्या क्रिकेट मैदानावर हा अंतिम सामना रंगणार आहे. लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवरील खेळपट्टी सुरुवातीला वेगवान गोलंदाजीसाठी अनुकूल असेल. पण सामना जसजसा पुढे जाईल तसतशी खेळपट्टी कोरडी पडण्याची शक्यता आहे, ज्याचा फायदा फिरकी गोलंदाजांना होऊ शकतो. जर फलंदाजांनी सुरुवातीच्या षटकांमध्ये विकेट न गमावता धावा काढल्या तर ही खेळपट्टी त्यांच्यासाठी अनुकूल असेल आणि ते मोठी धावसंख्या उभारण्यात यशस्वी होऊ शकतात.

लंडनमधील हवामानाचा अंदाज (SA vs AUS weather report)

अ‍ॅक्यूवेदर नुसार, लंडनमधील हवामान पहिल्या दिवशी चांगलं असणार आहे. सामन्याच्या सुरूवातीला २० अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान असेल आणि दिवसाचा खेळ संपेपर्यंत अखेरीस ते २३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते. कसोटीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी पावसाचा व्यत्यय येऊ शकतो, त्यामुळे पहिल्या दिवशी तापमान जास्त असल्याने नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. तसेच, WTC अंतिम सामन्यासाठी, जर खेळ पाच दिवसांत संपला नाही, तर तो सहाव्या दिवसापर्यंत जाऊ शकतो. कारण अंतिम फेरीसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दक्षिण आफ्रिका वि. ऑस्ट्रेलिया हेड टू हेड रेकॉर्ड (SA vs AUS Head to Head)

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत एकूण १०१ कसोटी सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी दक्षिण आफ्रिकेने २६ सामने जिंकले, तर ऑस्ट्रेलियाने ५४ सामने जिंकले. उर्वरित २१ सामने अनिर्णित राहिले.