पर्थ : भारतीय पुरुष हॉकी संघाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील अखेरच्या सामन्यात जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघाकडून २-५ अशा पराभवाला सामोरे जावे लागले.

पाचव्या आणि अखेरच्या सामन्यात भारताला कामगिरी उंचावता आली नाही आणि ऑस्ट्रेलियाकडून सलग दुसरा पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियाकडून ट्रेंट मिट्टन (११व्या आणि २४व्या मिनिटाला), फ्विन ऑगिलवि (तिसऱ्या मिनिटाला), ब्लेक गोवर्स (२८व्या मिनिटाला) आणि टिम ब्रँड (४३व्या मिनिटाला) यांनी गोल केले. भारताकडून निळकंठ शर्मा (१२व्या मिनिटाला) आणि रुपिंदरपाल सिंग (५३व्या मिनिटाला) यांनाच गोल करता आले.

पाहुण्या भारतीय संघाला पहिल्याच मिनिटाला गोल करण्याची संधी मिळाली होती, पण ऑस्ट्रेलियाच्या ईडी ऑकेनडेन याने ती हाणून पाडली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने प्रतिआक्रमण करत भारताच्या गोलक्षेत्रात मुसंडी मारली, मात्र गोलरक्षक कृष्णन पाठकने यजमानांना यश मिळू दिले नाही. त्यानंतर तिसऱ्या मिनिटाला ऑगिलवि याने ऑस्ट्रेलियासाठी पहिला गोल केला.

आठव्या मिनिटाला भारताला पहिला पेनल्टीकॉर्नर मिळाला, पण निळकंठला चेंडूवर नियंत्रण न मिळवता आल्याने भारताने ही संधी वाया दवडली. १०व्या मिनिटाला भारतानेही ऑस्ट्रेलियाचा पेनल्टीकॉर्नरवर केलेला प्रयत्न रोखला. ११व्या मिनिटाला गुरिंदर सिंगने चेंडूवरील नियंत्रण सुटल्यानंतर मिट्टन याने कोणतीही चूक न करता चेंडूला गोलजाळ्याची दिशा दाखवली. मात्र भारतानेही पुढच्याच मिनिटाला जशास तसे उत्तर देत भारताचे खाते खोलले. निळकंठने हा गोल केला. १९व्या मिनिटाला मनदीप सिंगने मारलेला फटका गोलबारला लागून बाहेर गेला.

२४व्या मिनिटाला मिट्टनने दुसरा गोल केल्यानंतर पाच मिनिटांनी ब्लेक गोवर्सने ऑस्ट्रेलियाच्या खात्यात चौथ्या गोलची भर घातली. तिसऱ्या सत्रात दोन्ही संघांनी गोल करण्याचे प्रयत्न केले, पण त्यात त्यांना अपयश आले. टिम ब्रँड याने ४३व्या मिनिटाला पाठकला चकवून गोल करत ऑस्ट्रेलियाला ५-१ असे आघाडीवर आणले. अखेरच्या क्षणी रुपिंदरच्या गोलमुळे भारताने पिछाडी भरून काढण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत सामना भारताच्या हातून निसटला होता.