द. आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठी संघात सहा नव्या खेळाडूंना संधी

सातत्याने निराशाजनक कामगिरी करणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाने अ‍ॅडलेड येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या कसोटीसाठी संघात तब्बल सहा बदल करण्याचा निर्णय घेतला. या दिवस-रात्र कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाने केलेल्या बदलात इंग्लंडमध्ये जन्मलेल्या सलामीवीर मॅट रेनशॉ याचा समावेश आहे. त्यासह पीटर हॅण्ड्सकोम्ब आणि निक मॅडिन्सन यांना पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. जलदगती गोलंदाज चॅड सॅयेर्स आणि जॅक्सन बर्ड यांनी राष्ट्रीय संघात पुनरागमन केले असून पीटर नेव्हिलच्या जागी यष्टीरक्षक मॅथ्यू वेडला संधी मिळाली आहे.

याआधी १९८४ साली ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत सहा खेळाडू बदलण्याचा निर्णय घेतला होता. होबार्ट कसोटीत एक डाव आणि ८० धावांनी झालेल्या मानहानिकारक पराभवामुळे जो बर्न्‍स़, अ‍ॅडम व्होग्स्, कॅल्युम फग्र्युसन, नेव्हील आणि जोस मेनी यांना संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. रॉडनी मार्श यांच्या राजीनाम्यानंतर निवड समितीचे प्रभारी प्रमुख ट्रेव्हर हॉन्स यांनी पदभार स्वीकारत हा निर्णय सुनावला.

संघ : स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), जॅक्सन बर्ड, पिटर हॅण्ड्सकोम्ब, जोश हेझलवूड, उस्मान ख्वाजा, नॅथन लियॉन, निक मॅडिंसन, मॅट रेनशॉ, चॅड सेयर्स, मिचेल स्टार्क, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर.