ऑस्ट्रेलियाने अॅशेज क्रिकेट मालिकेमध्ये ३-० ची आघाडी मिळवत मालिका जिंकलीय. तिसऱ्या कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाने इंग्लंवर एक डाव आणि १४ धावांनी विजय मिळवला. केवळ तीन दिवसांमध्ये तिसऱ्या कसोटीचा निर्णय लागलाय. ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असणाऱ्या या मालिकेमध्ये पाहुण्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना पहिल्या डावात १८५ धावा केल्या. त्याला उत्तर देताना यजमान ऑस्ट्रेलियन संघांने २६७ धावा केल्या. दुसऱ्या डावामध्ये ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी इंग्लंडच्या संघाला अवघ्या ६८ धावांमध्ये तंबूत परत पाठवलं आणि सामन्यासहीत मालिका तिसऱ्या दिवशीच खिशात घातली. या सामन्यानंतर आता ऑस्ट्रेलियन माहिला पत्रकार कोले अमांडाने इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनला ट्रोल केलं आहे.
झालं असं की दोन वर्षांपूर्वी मायकल वॉनने भारतीय संघाला डिवचलं होतं. याच ट्विटवर आजच्या सामन्यानंतर ऑस्ट्रेलियन महिला पत्रकाराने रिप्लाय दिलाय. २०१९ मध्ये न्यूझीलंडविरोधात हॅमिल्टन येथे खेळवण्यात आलेल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघ ९२ धावांवर तंबूत परतला होता. त्यानंतर वॉनने भारतीय संघावर टीका केली होती. “भारत ९२ वर ऑलाऊट झाला… आजच्या काळामध्ये एखादा संघ १०० धावांच्या आत ऑल आऊट होतो यावर विश्वास बसत नाही,” असा टोला ३१ जानेवारी २०१९ रोजी वॉनने केलेल्या ट्विटमधून लगावला होता.
नक्की वाचा >> Ashes: ड्रीम डेब्यू… ७ धावांमध्ये घेतले सहा बळी; इंग्लंडचा संघ ६८ वर All Out, ऑस्ट्रेलियाने जिंकली अॅशेस
याच ट्विटवर आता ऑस्ट्रेलियन क्रीडा पत्रकार असणाऱ्या अमांडाने इंग्लंडच्या संघाचा तिसऱ्या कसोटीमधील दुसऱ्या डावाचा स्कोअरकार्डचा फोटो शेअर केलाय. खरंय अशा अर्थाची कॅप्शन वॉनच्या फोटोला रिप्लाय करताना अमांडाने दिलीय.

भारत विरुद्ध न्यूझीलंडच्या सामन्यामध्ये बोल्टने २१ धावांमध्ये पाच विकेट्स घेतल्या होत्या. या सामन्यामध्ये रोहित शर्मा भारताचं नेतृत्व करत होता. या सामन्यात भारताकडून सर्वाधिक धावा युजवेंद्र चहलने केल्या होत्या. चहलने १८ धावा केलेल्या.
अॅशेजच्या तिसऱ्या कसोटीबद्दल बोलायचं झाल्यास वेगवान गोलंदाज स्कॉट बोलंडने वयाच्या ३२ व्या वर्षी ऑस्ट्रेलियाकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. स्कॉटनं आपल्या भन्नाट कामगिरीच्या जोरावर संघाला एक डाव आणि १४ धावांनी विजय मिळवून देत सामानावीर पुरस्कार पटकावला.