वृत्तसंस्था, केर्न्स (ऑस्ट्रेलिया) : फलंदाज म्हणून अपयश आल्यानंतरही कर्णधार म्हणून आरोन फिंचची एकदिवसीय कारकीर्दीची सांगता न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील ३-० अशा एकतर्फी यशाने झाली. स्टीव्ह स्मिथने (१३१ चेंडूंत १०५ धावा) केलेल्या शतकी खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने रविवारी तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडवर २५ धावांनी विजय मिळवला.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद २६७ धावा केल्या. त्यांच्या डावाची अडखळती सुरुवात झाली. कारकीर्दीतील अखेरचा एकदिवसीय सामना खेळणारा फिंच केवळ पाच धावा करून बाद झाला. तसेच जोश इंग्लिस १० धावांवर माघारी परतला. यानंतर स्मिथने मार्नस लबूशेनच्या (७८ चेंडूंत ५२) साथीने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. स्मिथने एकदिवसीय कारकीर्दीतील १२वे आणि जवळपास दोन वर्षांत पहिले आंतरराष्ट्रीय शतक ठरले.
त्यानंतर २६८ धावांचा पाठलाग करणाऱ्या न्यूझीलंडचा प्रतिकार ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी मोडून काढला. ग्लेन फिलिप्स (४७), जिमी नीशाम (३६) आणि मिचेल सँटनर (३०) यांनी अखेरीस काहीशी झुंज दिली. मात्र, न्यूझीलंडचा डाव २४२ धावांत आटोपला. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक तीन गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया : ५० षटकांत ५ बाद २६७ (स्टीव्ह स्मिथ १०५, मार्नस लबूशेन ५२, अॅलेक्स कॅरी ४२; ट्रेंट बोल्ट २/२५) विजयी वि. न्यूझीलंड : ४९.५ षटकांत सर्वबाद २४२ (ग्लेन फिलिप्स ४७, जेम्स नीशाम ३६; मिशेल स्टार्क ३/६०, कॅमेरुन ग्रीन २/२५)
- सामनावीर, मालिकावीर : स्टीव्ह स्मिथ