AUS vs SA 1st T20I: दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ जून महिन्यात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील अंतिम सामना खेळण्यासाठी मैदानात आले होते. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने बाजी मारून ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजयाची नोंद केली होती. आता दोन्ही संघ टी-२० मालिकेसाठी आमनेसामने येणार आहेत. सध्या दक्षिण आफ्रिकेचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० आणि ३ वनडे सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज (१० ऑगस्ट) डार्विनच्या मरारा क्रिकेट मैदानावर रंगणार आहे.
हा सामना ऐतिहासिक असणार आहे. कारण मरारा क्रिकेट स्टेडियमवर पहिल्यांदाच टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्याचा थरार रंगणार आहे.डार्विनमध्ये असलेलं मरारा क्रिकेट स्टेडियम हे ऑस्ट्रेलियातील आऊटडोअर क्रिकेट स्टेडियम आहे. या स्टेडियमचं वैशिष्ट्ये म्हणजे, या स्टेडियममध्ये ड्रॉप इन खेळपट्टीचा वापर करण्यात आलेला आहे. तसेच या सामन्यासाठी या स्टेडियमचं नुतनीकरण देखील करण्यात आलं आहे.
मरारा स्टेडियमला आंतरराष्ट्रीय स्टेडियमचा दर्जा मिळालेला आहे. याआधी या स्टेडियमवर २ कसोटी आणि ४ वनडे सामने खेळवले गेले आहेत. मात्र,टी-२० आंतरराष्ट्रीय सामना हा पहिल्यांदाच खेळवला जाणार आहे. याआधी २००८ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश हे दोन्ही संघ वनडे सामना खेळण्यासाठी आमनेसामने आले होते. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ७३ धावांनी बाजी मारली होती. आता १७ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर या मैदानावर आंतरराष्ट्रीय सामना खेळवला जाणार आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना ऐतिहासिक असणार आहे.
या मालिकेसाठी असे आहेत दोन्ही संघ:
असा आहे ऑस्ट्रेलियाचा संघ: ट्रॅव्हिस हेड, कॅमरन ग्रीन, मिचेल मार्श (कर्णधार), जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), टीम डेव्हिड, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल ओवेन, बेन ड्वार्शुइस, नॅथन एलिस, अॅडम झाम्पा, जोश हेजलवुड, सीन अबॉट, मॅथ्यू शॉर्ट, मॅथ्यू कुहनेमन.
असा आहे दक्षिण आफ्रिकेचा संघ: रायन रिकल्टन (यष्टीरक्षक), एडन मारक्रम (कर्णधार), रासी वॅन डर डूसेन, डेवाल्ड ब्रेव्हिस, ट्रिस्टन स्टब्स, जॉर्ज लिंडे, प्रेनेलन सुब्रायन, कॉर्बिन बॉश, कगिसो रबाडा, नांद्रे बर्गर, लुंगी एन्गिडी, सेनुरन मुथुसामी, नकाबायोमजी पीटर, क्वेना मफाका, लुआन-ड्रे प्रीटोरियस.