Australia vs England : भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत दोन्ही संघांमध्ये दमदार खेळ पाहायला मिळाला. मालिकेतील शेवटचा सामना ओव्हलच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने थरारक विजय नोंदवला. यासह ही मालिका २-२ ने बरोबरीत समाप्त झाली. ही मालिका झाल्यानंतर भारतीय संघ आता थेट आशिया चषक स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. तर इंग्लंडचा संघ दक्षिण आफ्रिकेविरूद्ध मर्यादित षटकांची मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

दरम्यान कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी इंग्लंडला फार काळ प्रतिक्षा करावी लागणार नाही. येत्या नोव्हेंबर महिन्यात क्रिकेट विश्वातील मानाची मानली जाणारी अॅशेस मालिका सुरू होणार आहे. दरम्यान या मालिकेत ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्राने मोठी भविष्यवाणी केली आहे.

ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू ग्लेन मॅकग्राने एका मुलाखतीत म्हटले की, ” मी वेगळी भविष्यवाणी करूच नाही. या मालिकेचा निकाल ५-० असा लागणार आहे. मला माझ्या संघावर पूर्ण विश्वास आहे. पॅट कमिन्स, जोश हेजलवूड आणि नॅथन लायन आपल्या घरच्या परिस्थितीत चांगली कामगिरी करत असतील, तर हे इंग्लंडसाठी धोकादायक आहे. तसेच इंग्लंडची कामगिरी पाहता, ते एक तरी कसोटी सामना जिंकणार की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.”

भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेली मालिका ही २-२ ने बरोबरीत राहिली. ग्लेन मॅकग्राचं म्हणणं आहे की, इंग्लंडचे फलंदाज या मालिकेत कमकुवत असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे अॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाचे प्रमुख गोलंदाज विरूद्ध इंग्लंडचे मुख्य आणि मधल्या फळीतील फलंदाज असा सामना पाहायला मिळू शकतो. तसेच तो पुढे म्हणाला, ” ही मालिका रूटसाठी अतिशय महत्वाची असणार आहे. त्याला ऑस्ट्रेलियात खेळताना हवं तितकं यश मिळवता आलेलं नाही. इथे त्याला एकही शतक झळकावता आलेलं नाही. मला ब्रुकला फलंदाजी करताना पाहायला आवडतं. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना सुरूवातीपासूनच ब्रुकवर दबाव टाकेल.”

अॅशेस मालिका ही दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाची मालिका आहे. त्यामुळे दोन्ही संघ ही मालिका आपल्या नावावर करण्यासाठी पूर्ण जोर लावतात. इंग्लंडने २०१५ मध्ये शेवटची अॅशेस मालिका जिंकली होती. २०२१- २२ मध्ये झालेल्या अॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाने ४-० ने बाजी मारली होती. ही मालिका इंग्लंडसाठी मुळीच सोपी नसणार आहे. कारण ऑस्ट्रेलियाने मायदेशात कसोटी मालिका खेळताना गेल्या १५ पैकी ११ सामन्यांमध्ये विजयाची नोंद केली आहे. यादरम्यान केवळ २ सामने ड्रॉ झाले आहेत. तर २ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे यावेळी कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.