निसर्गाची साथ नसेल तर परिस्थिती किती हाताबाहेर जाऊ शकते, याचा प्रत्यय ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या निमित्ताने येत आहे. मेलबर्नच्या रॉड लेव्हर परिसरात पाऱ्याने ४४ अंश सेल्सिअसची पातळी ओलांडल्याने संयोजकांना खेळ थोडय़ा वेळासाठी स्थगित करावा लागला. विविध कोर्ट्सवर सामने सुरू असतानाच अतिउष्ण वातावरणामुळे खेळ स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्पर्धेची प्रतिकूल वातावरणासंदर्भातील धोरणांची अंमलबजावणी करण्यात आल्याचे संयोजकांनी स्पष्ट केले. ज्या कोर्ट्सवर छताची व्यवस्था आहे, तेही तात्पुरते बंद करण्यात आले. त्यामुळे एकेरी तसेच दुहेरीच्या सामन्यांना विलंब झाला. असंख्य खेळाडूंनी या परिस्थितीत खेळणे जिकिरीचे असल्याचे सांगितले.
उष्णतेसंदर्भातील धोरण संयोजकांनी स्पष्ट करावे, अशी मागणी मारिया शारापोव्हाने केली आहे. शारापोव्हा आणि करिन नॅप यांच्यातील लढत तीन तास चालली. तिसऱ्या सेटदरम्यान अतिउष्णतेमुळे सामना काही काळासाठी स्थगित करण्यात आला होता, मात्र नियमामुळे थोडय़ाच वेळात त्यांना कोर्टवर परतावे लागले. ‘‘उष्णतेसंदर्भातील नियम काय? किती उष्णता-आद्र्रता धोकादायक आहे? याबाबत खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक यांना पुरेशी माहिती नाही. संयोजकांनी पुढाकार घेऊन याबाबत तपशीलवार माहिती द्यावी,’’ असे शारापोव्हाने सांगितले.
१९९८मध्ये ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेत उष्णतेच्या आव्हानासंदर्भातील धोरण अंगीकारण्यात आले. हवेचे वातावरण, आद्र्रता, वारा आणि सूर्यप्रकाश या घटकांच्या गणितीय समीकरणांनुसार परिस्थिती खेळण्यायोग्य आहे की नाही, हे ठरवले जाते. यानुसार ज्या कोर्ट्सवर आच्छादनाची व्यवस्था आहे, ते छत बंद करण्यात येते.
या वातावरणात शारीरिक व्यायाम करणे अशक्य आहे. प्रेक्षकांसाठीही अशा वातावरणात सामने पाहणे वाईट अनुभव असेल, अशा शब्दांत फ्रान्सच्या अलिझ कॉर्नेटने आपल्या भावना व्यक्त केल्या. अतिउष्णतेचा अमेरिकेच्या वार्वरा लेपचेन्कोला फटका बसला. तिचे नाडीचे ठोके आणि रक्तदाब वाढल्यामुळे तिच्यावर उपचार करण्यात आले. तप्त वातावरणामुळे कोर्ट्सवर बसून उपचार करणे शक्य नसल्याने खुच्र्यावर बसून उपचार करावे लागले.

कॅनडाच्या फ्रँक डॅनसेव्हिकने डोळ्यापुढे अंधारी येत असल्याची तक्रार केली तर बेनाइट पेअरने या वातावरणात खेळणे अमानवी असल्याचे सांगितले. या वातावरणामुळे माझा जीव जाईल, अशी भीती क्रोएशियाच्या इव्हान डोडिगने व्यक्त केली. चीनच्या पेंग शुअईला पायात गोळे आणि उलटीचा त्रास जाणवला. या परिस्थितीत सामने खेळवून, संयोजक खेळाडूंचे आयुष्य धोक्यात घालत असल्याचे अँडी मरेने म्हटले आहे. अशा वातावरणात खेळल्यामुळे खेळाडूंना हृदयविकाराचा झटका येऊ शकतो, असे त्याने पुढे सांगितले. मेलबर्नच्या परिसरातील जंगलात वणवा भडकल्याने उष्णता वाढल्याचे संयोजकांनी सांगितले.