ग्रॅण्ड स्लॅम जेतेपदासाठी आव्हानात्मक ठरणारे रॉजर फेडरर आणि राफेल नदाल हे तारे आधीच लुप्त झाले होते. त्यामुळे टेनिस क्षितिजावरील अजेय तीन ताऱ्यांपैकी ऑस्ट्रेलियन खुल्या स्पध्रेच्या अखेरच्या शर्यतीत तो एकच तारा उरला होता. त्याच वेळी दुसऱ्या फळीतल्या खेळाडूंची घोडदौड त्याला जेतेपदापासून हिरावण्यासाठी आतुर होती. दुसरीकडे जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थान आणि स्पर्धेसाठी मिळालेले अव्वल मानांकन पणाला लागलेले. खडतर आव्हानांची समीकरणे पेलत नोव्हाक जोकोव्हिचने अ‍ॅण्डी मरेला नामोहरम केले. जोकोव्हिचचे हे टेनिस कारकीर्दीतील आठवे ग्रॅण्ड स्लॅम तर या स्पर्धेचे पाचवे विजेतेपद आहे. जेतेपदासह जोकोव्हिचने आपले जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थानही कायम राखले आहे.
तीन तास आणि ३९ मिनिटांच्या अटीतटीच्या अंतिम मुकाबल्यात जोकोव्हिचने मरेवर ७-६ (७-५), ६-७ (४-७), ६-३, ६-० अशी मात केली. अंतिम लढतीत पाच वेळा धडक मारत प्रत्येक वेळी जेतेपद पटकावण्याचा विक्रमही त्याने नावावर केला. या स्पर्धेची सर्वाधिक सहा विजेतेपदे पटकावण्याचा विक्रम रॉय इमर्सनच्या नावावर आहे. हा विक्रम मोडण्याची जोकोव्हिचला पुढील वर्षी संधी असेल. या विजयासह जोकोव्हिचने या स्पर्धेच्या अंतिम लढतीत चारपैकी तीनवेळा मरेवर विजय मिळवला आहे. या विजयासह जोकोव्हिचने अ‍ॅण्डी मरेविरुद्धची कामगिरी १६-८ अशी सुधारली आहे.
पहिल्या सेटमध्ये जोकोव्हिचने ४-१ अशी आक्रमक सुरुवात केली, मात्र मरेने दोनदा जोकोव्हिचची सव्‍‌र्हिस भेदत पिछाडी २-४ अशी भरून काढली. मात्र मरेच्या स्वैर व्हॉलीमुळे ५-५ बरोबरीतून जोकोव्हिचने आगेकूच करत पहिला सेट नावावर केला.
दुसऱ्या सेटमध्ये मरेने २-० आघाडी घेतली, मात्र यानंतर सलग १३ गुणजिंकत जोकोव्हिचने सरशी साधली. प्रदीर्घ रॅलींच्या आधारे मरेने ४-४ अशी बरोबरी केली. तीन ब्रेकपॉइंट वाचवत मरेने मुकाबला ५-५ असा नेला. टायब्रेकरमध्ये चिवट खेळ करत मरेने दुसरा सेट जिंकला.
तिसऱ्या सेटमध्ये जोकोव्हिचची सव्‍‌र्हिस भेदण्यात मरेने यश मिळवले. मात्र त्यानंतर विलक्षण ऊर्जेनिशी खेळणाऱ्या जोकोव्हिचने पल्लेदार जमिनीलगतच्या फटक्यांच्या आधारे तिसरा सेट नावावर केला. चौथ्या सेटमध्ये प्रदीर्घ रॅली, अचूक सव्‍‌र्हिस आणि नेटजवळून शैलीदार खेळ करत जोकोव्हिचने जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अ‍ॅण्डी सातत्यपूर्ण प्रदर्शनासह संघर्ष करणारा अव्वल दर्जाचा खेळाडू आहे. त्याच्यासारख्या तुल्यबळ प्रतिस्पध्र्याला नमवण्याचे समाधान आहे. दरवर्षी या स्पर्धेत अतुच्च्य दर्जाच्या खेळाचे प्रदर्शन घडते. या स्पर्धेचे जेतेपद पटकवणाऱ्या महान खेळाडूंच्या मांदियाळीत स्थान मिळवणे सन्मानाची गोष्ट  आहे. या यशात प्रशिक्षक बोरिस बेकर आणि सहकाऱ्यांचा मोलाचा वाटा आहे.
– नोव्हाक जोकोव्हिच

 

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Australian open novak djokovic enters elite club
First published on: 02-02-2015 at 01:18 IST