वृत्तसंस्था, मेलबर्न

गतविजेत्या आणि अग्रमानांकित राफेल नदालचे ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतील आव्हान बुधवारी दुसऱ्याच फेरीत संपुष्टात आले. गेल्या वर्षी विविध दुखापतींशी झुंजत नदालने ऑस्ट्रेलियन स्पर्धा जिंकली होती. यंदा मात्र दुखापतीला मागे सारणे त्याला शक्य झाले नाही. अमेरिकेच्या मकेन्झी मॅकडोनाल्डने नदालला ६-४, ६-४, ७-५ असे सरळ सेटमध्ये पराभूत केले.

विक्रमी २२ ग्रँडस्लॅम विजेत्या नदालला या वर्षांच्या सुरुवातीला लय सापडलेली नाही. ऑस्ट्रेलियन स्पर्धेच्या पहिल्या फेरीत नदालने यंदाच्या हंगामातील पहिला विजय मिळवला होता. दुसऱ्या फेरीत मॅकडोनाल्डविरुद्ध मात्र नदाल अपेक्षित खेळ करू शकला नाही. या सामन्यातील दुसऱ्या सेटमध्ये नदालला दुखापत झाली. त्यामुळे ट्रेनरनी कोर्टवर येत त्याची विचारपूस केली. तसेच नदालला दुखापतीची विश्रांतीही घ्यावी लागली. या वेळी स्टेडियममध्ये उपस्थित नदालची पत्नी भावुक झालेली दिसली. नदालने उपचार घेतल्यानंतर सामना पुढे खेळत राहण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याला धावताना त्रास जाणवत होता. या स्थितीतही नदालने तिसऱ्या सेटमध्ये मॅकडोनाल्डला झुंज दिली; परंतु अखेरीस त्याची ही झुंज अपुरी पडली.

पुरुष एकेरीतील अन्य लढतीत तिसऱ्या मानांकित ग्रीसच्या स्टेफानोस त्सित्सिपासने ऑस्ट्रेलियाच्या रिंकी हिजकाताचा ६-३, ६-०, ६-२ असा सहज पराभव केला. तसेच गेल्या दोन ऑस्ट्रेलियन स्पर्धामध्ये उपविजेतेपद मिळवणाऱ्या सातव्या मानांकित डॅनिल मेदवेदेव्हने ऑस्ट्रेलियाच्या जॉन मिलमनवर ७-५, ६-२, ६-२ अशी मात केली.

महिलांमध्ये अग्रमानांकित पोलंडच्या इगा श्वीऑनटेकने कोलंबियाच्या कामिला ओसोरिओला ६-२, ६-३ असे नमवत तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. तिसऱ्या मानांकित अमेरिकेच्या जेसिका पेगुलाने आलिक्सांड्रा सॅस्नोव्हिचचा ६-२, ७-६ (७-५) असा पराभव केला. सहाव्या मानांकित ग्रीसच्या मारिया सक्कारीने डायना शनायडरचे आव्हान ३-६, ७-५, ६-३ असे परतवून लावले. सातव्या मानांकित कोको गॉफने अमेरिकन खुल्या स्पर्धेतील माजी विजेत्या एमा रॅडूकानूला ६-३, ७-६ (७-४) असे नमवत पुढील फेरी गाठली.