गाब्बावर २४ वर्षे राखलेले ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व संपविण्याचा दक्षिण आफ्रिका संघाचा इरादा आहे. पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळातून नेमके हेच प्रकट होत होते. जागतिक कसोटी क्रमवारीतील अग्रस्थानावरील दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात ४५० धावांचे आव्हान उभारले. त्यानंतर दिवसअखेर मायकेल क्लार्कच्या ऑस्ट्रेलियाला दडपणाखाली ३ बाद १११ धावा करता आल्या. खेळ थांबला तेव्हा क्लार्क ३४ आणि सलामीवीर ईडी कोवन ४९ धावांवर खेळत होते. या दोघांनी ७१ धावांची नाबाद भागीदारी रचली आहे. या मैदानावर १९८८मध्ये ऑस्ट्रेलियाने अखेरची कसोटी गमावली होती. वेस्ट इंडिज संघाने हा विजय मिळवला होता.
जॅक कॅलिससाठी रविवारचा दिवस संस्मरणीय होता. त्याने आपल्या कसोटी कारकीर्दीतील ४४वे शतक साकारले. सर्वाधिक कसोटी शतके झळकाविणाऱ्यांच्या क्रमवारीत कॅलिस हा सचिननंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धचे हे त्याचे पाचवे शतक. त्याने १४७ धावांची खेळी उभारताना १४ चौकार आणि एक षटकार ठोकला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाची फलंदाजी चालू असताना कॅलिसने स्लिपमध्ये दोन सुरेख झेलही टिपले. हशीम अमलानेही (१०४) संयमी शतक साकारले. कॅलिस आणि अमला या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी १६५ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. पीटर सिडलच्या गोलंदाजीवर पायचीत होऊन माघारी परतणाऱ्या अमलाने कारकीर्दीतील १७वे शतक साजरे केले.  ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार डावांतील हे त्याचे तिसरे शतक ठरले. कॅलिस आणि अमलाच्या शतकांमुळेच दक्षिण आफ्रिकेला १५१.४ षटकांत ४५० अशी समाधानकारक धावसंख्या उभारता आली.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Austrellia alert against south africa
First published on: 12-11-2012 at 01:15 IST