मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर क्रिकेटमधून निवृत्त झाला असला, तरी त्याच्या फलंदाजीचे गारूड आजही क्रिकेटजगतावर कायम आहे. त्यामुळेच सचिनला भेटण्यासाठी किंवा प्रत्यक्ष पाहण्यासाठी तो जिथे जाईल तेथे चाहत्यांची गर्दी उसळते. पण पालघरमधील दांडी गावातील रिक्षाचालक रमाकांत वझे यांचा मुलगा तन्वीष हा गेल्या आठवडय़ात दोन दिवस चक्क सचिनच्या घरी मुक्कामाला होता. हे कोणत्या स्पर्धेत तन्वीषला मिळालेले बक्षीस नाही तर, १६ वर्षांच्या तन्वीषने अल्पावधीत क्रिकेट जगतात मिळवलेले नाव हे त्याच्या या पाहुणचाराचे रहस्य आहे.
१६ वर्षांचा तन्वीष हा दांडी गावातील रहिवासी आहे. त्याचे वडील रिक्षा चालवतात तर, आई घरकाम करते. अशा गरीब कुटुंबात जन्मलेल्या तन्वीषने लहानपणापासूनच क्रिकेटमध्ये चमक दाखवण्यास सुरुवात केली. मुंबईच्या १४ वर्षांखालील संघात स्थान मिळवल्यानंतर तन्वीषने त्या पातळीवरील स्पर्धातही अष्टपैलू कामगिरी दाखवली. त्याच जोरावर तन्वीषची १६ वर्षांखालील भारतीय क्रिकेट संघात निवड झाली. महिनाभरापूर्वी इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या १६ वर्षांखालील भारतीय क्रिकेट संघातून खेळताना तन्वीषने दणदणीत शतक झळकावले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन हादेखील याच संघातून खेळला. हे दोघेही मुंबईच्या १६ वर्षांखालील संघातूनही एकत्र खेळतात. याच काळात तन्वीषची अर्जुनशी मैत्री झाली. गेल्याच आठवडय़ात तन्वीष अर्जुनच्या घरी मुक्कामाला राहिला. अर्जुन आणि सचिनसोबतची त्याची छायाचित्रे सध्या ‘व्हॉट्सअॅप’वरून फिरत असून तन्वीषच्या या भरारीचे कौतुकही केले जात आहे.
चिंचणीच्या के.डी.हायस्कूलमधून शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेला तन्वीष सध्या मुंबईच्या रिझवी महाविद्यालयात शिक्षण घेतो आहे. सध्या तो १६ वर्षांखालील विजय र्मचट ट्रॉफी स्पर्धेत खेळत असून १ ते ३ डिसेंबरदरम्यान बडोद्याविरुद्ध झालेल्या सामन्याच्या पहिल्या डावात तन्वीषने एक बळी मिळवला, शिवाय नाबाद ६३ धावाही पटकावल्या. या सामन्यात मुंबईने बडोद्यावर दहा गडी राखून विजय मिळवला. आता तन्वीष मुंबईच्या संघातून येत्या ११ डिसेंबर रोजी होणाऱ्या गुजरात विरुद्धच्या सामन्यातही खेळणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 10th Dec 2015 रोजी प्रकाशित
रिक्षाचालकाचा मुलगा तेंडुलकरचा पाहुणा!
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर क्रिकेटमधून निवृत्त झाला असला, तरी त्याच्या फलंदाजीचे गारूड आजही क्रिकेटजगतावर कायम आहे.
Written by रत्नाकर पवार
Updated:

First published on: 10-12-2015 at 08:09 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Auto rickshaw driver son meets sachin