टोक्यो : जपानच्या अकाने यामागुचीने रविवारी जागतिक अजिंक्यपद बॅडिमटन स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद राखले. तसेच पुरुष विभागात डेन्मार्कचा व्हिक्टर अ‍ॅक्सेलसेन विजेता ठरला.

महिला एकेरीच्या अंतिम लढतीत यामागुचीने चीनच्या शेन युफेईचा प्रतिकार २१-१२, १०-२१, २१-१४ असा मोडून काढला. यामागुचीने कारकीर्दीत दुसऱ्यांदा जागतिक विजेतेपद पटकावले. तिने गेल्या वर्षी पहिले विजेतेपद मिळविले होते. चीनला मात्र २०११ सालापासून विजेतेपदापासून वंचित राहावे लागले. पुरुष एकेरीत अव्वल मानांकित अ‍ॅक्सेलसेनने अंतिम लढतीत थायलंडच्या कुनलावत वितिदसार्नचा २१-५, २१-१६ असा पराभव केला. यंदाच्या हंगामात अ‍ॅक्सेलसेनने कमालीचे सातत्य राखले असून, तो केवळ एकच लढत हरला आहे. या हंगामातील त्याचे हे सहावे विजेतेपद ठरले. अ‍ॅक्सेलसेनने गतवर्षी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवले होते, तर २०१७ मध्ये तो जागतिक विजेता ठरला होता.