दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामन्यात बॉल टॅम्परिंग प्रकरणी ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा सहभाग समोर आल्यानंतर संपूर्ण क्रिकेट विश्वाला हादरा बसला. टेलिव्हीजन कॅमेऱ्यात बॉलशी छेडछाड करताना कैद झालेल्या कॅमरुन बँकरॉफ्ट याचसोबत, रणनितीचा भाग असलेल्या स्टीव्ह स्मिथ आणि डेव्ही़ड वॉर्नरवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एका वर्षाच्या बंदीची शिक्षा घातली. या घटनेनंतर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसिसने, स्टीव्ह स्मिथला फोनवर मेसेज करत घडलेल्या प्रकाराबद्दल सहानुभूती व्यक्त केली.

अवश्य वाचा – स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरला २०१६ मध्येही मिळाली होती ताकीद – रिपोर्ट

ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरची कसोटी सुरु होण्याआधी फाफ डु प्लेसिस पत्रकारांशी संवाद साधत होता. त्या घटनेनंतर आपण स्मिथला मोबाईलवर मेसेज केला असून, आपल्याला सहानुभूती वाटत असल्याचं डु प्लेसिस म्हणाला. “पुढचे काही दिवस स्मिथसाठी नक्कीच त्रासदायक ठरणार आहेत. मात्र तो एक कणखर खेळाडू आहे, आणि यातून बाहेर येण्यासाठी एक खेळाडू म्हणून माझा त्याला पूर्ण पाठींबा आहे. स्मिथ हा एक अतिशय चांगला खेळाडू आहे. मात्र दुर्दैवाने चुकीच्या वेळी तो या प्रकरणात फसला गेला.”

अवश्य वाचा – IPL 2018 – राजस्थान रॉयल्स संघात ‘हा’ खेळाडू घेणार स्टीव्ह स्मिथची जागा

तिसऱ्या कसोटीत पत्रकार परिषदेदरम्यान स्टीव्ह स्मिथ आणि बँकरॉफ्ट यांनी आपण बॉल टॅम्परिंग केल्याचं मान्य केलं होतं. किंबहुना हा आपल्या संघाच्या रणनितीचा एक भाग असल्याचं स्मिथने मान्य करत घडलेल्या प्रकाराची जबाबदारी कर्णधार या नात्याने आपल्यावर घेतली. यानंतर क्रिकेट विश्वात एकच खळबळ माजली. क्रिकेट ऑस्ट्रेलियानेही घडलेल्या प्रकाराची गंभीर दखल घेत तिन्ही खेळाडूंना मायदेशी बोलवून घेतलं. यानंतर सुनावलेल्या शिक्षेत स्मिथ आणि वॉर्नरवर एका वर्षाची तर बँकरॉफ्टवर ९ महिन्यांच्या बंदीची शिक्षा लादण्यात आली. स्टिव्ह स्मिथच्या अनुपस्थितीत यष्टीरक्षक फलंदाज टीम पेन ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करणार आहे.

अवश्य वाचा – माझ्या कृत्याने आई-वडिलांना नाहक त्रास, पत्रकार परिषदेत स्टीव्ह स्मिथला रडू अनावर