कॉर्पोरेट करंडक स्पर्धेदरम्यान असभ्य वर्तन केल्याप्रकरणी सामनाधिकारी धनंजय सिंग यांच्या अहवालानंतर भारताचा वेगवान गोलंदाज प्रवीण कुमार याला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून कारणे दाखवा नोटिस पाठवण्यात आली असून त्याच्यावर बंदीची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यामुळे त्याला बीसीसीआय आणि संलग्न राज्य संघटनांच्या कोणत्याही स्पर्धामध्ये खेळता येणार नाही.
बीसीसीआयने शनिवारी दुपारी प्रवीण कुमारला पत्र पाठवले असून त्याने कॉर्पोरेट करंडक स्पर्धेदरम्यान घातलेल्या धिंगाण्याप्रकरणी स्पष्टीकरण मागवले आहे. या पत्राची प्रत बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष आणि बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन, अरुण जेटली आणि निरंजन शाह यांनाही पाठवण्यात आली आहे. शिस्तपालन समितीसमोर या प्रकरणाची सुनावणी होणार असून त्यानंतर प्रवीण कुमारवर कारवाई करण्यात येईल. ‘‘प्रवीण कुमारला पत्र पाठवून आम्ही त्याच्याकडून स्पष्टीकरण मागवले आहे. तोपर्यंत त्याला कोणत्याही सामन्यात खेळता येणार नाही. शिस्तपालन समिती याप्रकरणी निर्णय घेईपर्यंत ही बंदी कायम असेल,’’ असे बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले.
विशेष म्हणजे, विभागीय एकदिवसीय स्पर्धेसाठी प्रवीण कुमारची उत्तर प्रदेशच्या १५ सदस्यीय संघात निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी उत्तर प्रदेशचा संघ रविवारी सकाळी इंदूरला रवाना होणार आहे. पण या नोटिशीनंतर त्याला उत्तर प्रदेश संघातून वगळण्यात आले आहे. गेल्या आठवडय़ात रायपूर येथे झालेल्या बीसीसीआयच्या कॉर्पोरेट करंडक स्पर्धेदरम्यान ओएनजीसीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रवीण कुमारने आयकर विभागाविरुद्धच्या सामन्यात फलंदाज अजितेश अरगल याला अपशब्द वापरले होते. तसेच मैदानावरील पंच कमलेश शर्मा आणि अजित दातार यांच्याशीसुद्धा त्याचे खटके उडाले होते. सामन्यानंतरच्या सुनावणीदरम्यान प्रवीणकुमारच्या मानधनातून १०० टक्के रक्कम कापण्याचा तसेच त्याला कठोर शब्दांत ताकीद देण्यात आली होती. सामनाधिकारी धनंजय सिंग यांनी प्रवीण कुमारचे मानसिक संतुलन ढासळल्याचा अहवाल बीसीसीआयकडे सादर केला होता. या सामन्यादरम्यान प्रवीण कुमार अधिक आक्रमक झाला होता. त्याने आपल्या सहकाऱ्यांसह प्रतिस्पर्धी खेळाडूंवर अपशब्दांची सरबत्ती केली, असेही या अहवालात म्हटले आहे.
बीसीसीआय मात्र प्रवीण कुमारसारख्या आंतरराष्ट्रीय खेळाडूचे हे कृत्य खपवून घेण्यात तयार नाही. ‘‘प्रवीण कुमारच्या या कृत्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आंतरराष्ट्रीय खेळाडू हे लोकांच्या नजरेत अनुकरणीय असतात. त्यामुळे आपण कसे वागायला हवे, हे त्यांना माहित असणे गरजेचे आहे. प्रवीण कुमारच्या स्पष्टीकरणानंतर त्याला सुनावणीसाठी बोलवायचे की नाही, याचा निर्णय शिस्तपालन समिती घेईल,’’ असेही या अधिकाऱ्याने सांगितले. अन्य खेळाडूंना धडा मिळावा, यासाठी बीसीसीआय प्रवीण कुमारवर कठोर कारवाई करणार असल्याचे सूत्रांकडून समजते.