बोरुशिया डॉर्टमंडला ३-१ असे नमवून बार्सिलोनाचा दिमाखात उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

एएफपी, पॅरिस

प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंनाही आपल्या कौशल्यपूर्ण खेळाच्या प्रेमात पाडणाऱ्या फुटबॉलपटू लिओनेल मेसीची जादू बार्सिलोनासाठी ७००व्या सामन्यात खेळतानाही दिसून आली. स्वत: एक गोल नोंदवून लुइस सुआरेझ आणि अ‍ॅन्टोइन ग्रीझमन या दोघांच्याही गोलमध्ये सहाय्यकाची यशस्वी भूमिका मेसीने बजावली. त्यामुळेच बार्सिलोनाने गुरुवारी रात्री झालेल्या चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या सामन्यात बोरुशिया डॉर्टमंडला ३-१ अशी धूळ चारून उपउपांत्यपूर्व फेरीतील स्थान पक्के केले.

या विजयासह ‘फ’ गटात अग्रस्थानी असलेल्या बार्सिलोनाच्या खात्यात पाच सामन्यांतून ११ गुण जमा असून दुसऱ्या क्रमांकावरील इंटर मिलानपेक्षा ते चार गुणांनी आघाडीवर आहेत.

कॅम्प नाऊ येथे झालेल्या या लढतीत बार्सिलोनाने सुरुवातीपासूनच आक्रमणावर भर दिला. २९व्या मिनिटाला मेसीने केलेल्या पासचे सुआरेझने गोलमध्ये रूपांतर करून बार्सिलोनाला आघाडी मिळवून दिली. तर पुढील चार मिनिटांतच (३३वे) मेसीनेही गोल झळकावून डॉर्टमंडच्या कमकुवत बचावाचा फायदा उचलला. डॉर्टमंडच्या ह्य़ुमेल्सने आपल्या संघातील खेळाडूला पास देण्याऐवजी चुकीने सुआरेझकडे चेंडू सोपवला आणि मग सुआरेझ-मेसीच्या जोडीने उर्वरित कार्य सहज पूर्ण करून बार्सिलोनाची आघाडी २-० अशी वाढवली.

मध्यंतरापर्यंत २-० अशी आघाडी कायम राखल्यानंतर ६७व्या मिनिटाला ग्रीझमननेसुद्धा गोल करण्याची संधी न गमावता मेसीने गोलजाळ्याच्या डाव्या दिशेने दिलेल्या पासचे अप्रतिमरीत्या गोलमध्ये रूपांतर करून संघासाठी तिसरा गोल नोंदवला. फ्रान्सच्या ग्रीझमनचा हा यंदाच्या चॅम्पियन्स लीगमधील पहिलाच गोल ठरला. ७७व्या मिनिटाला जेडॉन सँचोने डॉर्टमंडसाठी सामन्यातील एकमेव गोल नोंदवला. परंतु उर्वरित वेळेत त्यांना पिछाडी भरून काढणे जमले नाही आणि बार्सिलोनाच्या ३-१ अशा विजयावर शिक्कामोर्तब झाले.