बार्सिलोना : नामांकित फुटबॉलपटू व संघाचा आधारस्तंभ लिओनेल मेसीला जवळपास ६० मिनिटे मैदानाबाहेर ठेवूनही बार्सिलोनाने मंगळवारी रात्री ला लिगा फुटबॉलमध्ये व्हॅलेन्सिया संघावर २-० अशी मात केली. लुईस सुआरेझ व कार्लेस अलेना यांनी बार्सिलोनासाठी प्रत्येकी एक गोल केला.

या विजयासह बार्सिलोनाचे ३४ सामन्यांतून २४ विजयांसह ८० गुण झाले असून द्वितीय क्रमांकावरील अ‍ॅटलेटिको माद्रिदपेक्षा ते १२ गुणांनी पुढे आहेत. बार्सिलोनाचे अद्याप चार सामने बाकी असले तरी या विजयामुळे त्यांचे विजेतेपद जवळपास निश्चित झाले आहे.

पहिल्या सत्रात दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. अलेनाने ५४व्या मिनिटाला पहिला गोल करत बार्सिलोनाचे खात उघडले. त्यानंतर जेरार्ड पिक्यूने लगावलेला फटका व्हॅलेन्सियाचा बचावपटू पिनाच्या हाताला लागल्यामुळे बार्सिलोनाला पेनल्टी बहाल करण्यात आली. याचा फायदा उचलत सुआरेझने ६०व्या मिनिटाला संघासाठी दुसरा गोल नोंदवला.

६१व्या मिनिटाला मेसीचे आगमन झाले. उर्वरित मिनिटांत त्याला गोल करण्यात अपयश आले असले तरी संघातील बचावपटूंनी व्हॅलेन्सियाला रोखून धरल्यामुळे बार्सिलोनाने २-० अशा विजयाची नोंद केली.

बार्सिलोना 

अलेना  ५४’

सुआरेझ ६०’ (पे.)

व्हॅलेन्सिया

0