लेव्हांटेवर १-० अशी मात; सलग दुसरे आणि एकूण २६वे विजेतेपद
जगातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू लिओनेल मेसीने नोंदवलेल्या एकमेव निर्णायक गोलच्या बळावर बार्सिलोनाने ला लिगा फुटबॉलच्या अंतिम सामन्यात लेव्हांटेवर १-० अशी सरशी साधून विजेतेपदाला गवसणी घातली.
मध्यांतरापूर्वी दोन्ही संघांनी बचावावर अधिक लक्ष केंद्रित केल्यामुळे कोणालाही गोल करता आला नाही. दुसऱ्या सत्रात ४६व्या मिनिटाला फिलिप कुटिन्होच्या जागी बदली खेळाडू म्हणून मेसीचे मैदानावर आगमन झाल्यामुळे बार्सिलोनाने प्रामुख्याने आक्रमणावर भर दिला. ६२व्या मिनिटाला ओस्माने डेम्बेलेने लेव्हांटेच्या गोलजाळ्याजवळील क्षेत्रातून प्रथम लुइस सुआरेझ, सुआरेझने अर्टुरो विदाल आणि विदालने मेसीला चेंडू सोपवत सुरेख चाल रचली. अखेरीस मेसीने हळुवारपणे चेंडूला गोलजाळ्याची दिशा दाखवून हंगामातील ३४वा आणि सामन्यातील निर्णायक गोल केला.
यानंतर लेव्हांटेच्या खेळाडूंनी बरोबरी साधण्यासाठी फार परिश्रम केले. गोल करण्याच्या प्रयत्नात प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना पाडल्यामुळे लेव्हांटेच्या तीन खेळाडूंना पिवळे कार्ड दाखवण्यात आले. या विजयासह बार्सिलोनाने ३५ सामन्यांतून २५ विजय, आठ बरोबरी आणि दोन पराभवांसह सर्वाधिक ८३ गुण कमावले असून दुसऱ्या क्रमांकावरील अॅटलेटिको माद्रिदपेक्षा ते ९ गुणांनी पुढे आहेत. परंतु अॅटलेटिकोने पुढील तीन सामने जिंकल्यास व बार्सिलोना उर्वरित तीनही सामने हरल्यास अॅटलेटिकोचे बार्सिलोनाइतकेच गुण होतील. मात्र सरस गोल फरकाच्या (२५ गोल) बळावर बार्सिलोनाच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब झाले.
- बार्सिलोनाचे हे सलग दुसरे विजेतेपद ठरले आहे. २०१६मध्ये त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.
- बार्सिलोनाच्या नावावर २६ ला लिगा जेतेपदे जमा असून फक्त रेयाल माद्रिद (३३) त्यांच्यापेक्षा पुढे आहे.
- गेल्या ११ वर्षांत बार्सिलोनाने आठव्यांदा ला लिगाचे विजेतेपद मिळवले. मेसीचे खेळाडू म्हणून हे १०वे ला लिगा विजेतेपद ठरले.
अनेक आव्हानात्मक संघांचा समावेश असलेल्या ला लिगामध्ये सलग दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवल्यामुळे मला माझ्या संघातील खेळाडूंचा अभिमान वाटतो. चाहत्यांचा विश्वास आम्ही सार्थ ठरवला. त्यांच्या आनंदातच आमचे समाधान आहे. अखेरीस मेसीने तो सर्वोत्तम का आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध केले. – एर्नेस्टो व्हॅल्वर्ड, बार्सिलोनाचे प्रशिक्षक