वेगवान गोलंदाजांचे ‘यॉर्कर’ हे एक अस्त्र आहेच. पण सध्याच्या फलंदाजांच्या पदलालित्यामुळे ‘यॉर्कर’ फारचकमी झाले आहेत, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज बेट्र ली याने सांगितले.

मूक-बधिर व्यक्तींसाठी अत्याधुनिक श्रवण यंत्र कॉक्लियर या कंपनीने बनवले आहे. हे यंत्र विशिष्ट शस्त्रक्रियेद्वारे शरीरामध्ये बसवण्यात येते. भारतामध्ये ब्रेटच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले असून त्याची या कंपनीने भारतातील श्रवणदूत म्हणून नेमणूक केली आहे. या निमित्ताने खास बातचीत करताना ब्रेट म्हणाला की, ‘‘पूर्वीचे फलंदाज क्रीझमध्ये उभे राहायचे. पण सध्याचे फलंदाज क्रीझच्या बाहेर जास्त करून उभे राहतात. त्याचबरोबर ते काही वेळा पदलालित्यामध्ये बदल करून पुढे चाल करून येतात. त्या वेळी जर ‘यॉर्कर’ टाकायचा प्रयत्न केला तर तो चेंडू थेट बॅटवर येतो आणि फलंदाजाला फटके मारायला अधिक सोपे होते. त्यामुळे सध्याचे वोगवान गोलंदाज उसळी देणारे चेंडू किंवा संथ गतीच्या चेंडूंना अधिक प्राधान्य देतात.’’
दक्षिण आफ्रिकेच्या भारतीय दौऱ्याबाबतही ब्रेटने आपले मत व्यक्त केले. तो म्हणाला की, ‘‘वानखेडेवर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ४३४ धावा केल्या. या धावा फारच जास्त होत्या. दक्षिण आफ्रिकेने शतकाची वेस ओलांडल्यावरही फक्त एकच फलंदाज गमावला होता. यावरून ते मोठी धावसंख्या गाठणार हे स्पष्ट झाले होते. पण ते चारशेहून अधिक धावा करतील, असे मात्र वाटले नव्हते. दक्षिण आफ्रिकेचा संघ हा पूर्णपणे व्यावसायिक आहे, त्यामुळे त्यांच्याकडून अशाच नेत्रदीपक कामगिरीची अपेक्षा आपण करू शकतो.’’
आगामी कसोटी मालिकेबद्दल ब्रेट म्हणाला की, ‘‘पाटा खेळपट्टी जरी असली तरी गोलंदाजांसाठी टप्पा आणि दिशा या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात. या कसोटी सामन्यात गोलंदाजांनी या दोन गोष्टींवर भर द्यायला हवा. माझ्या मते सातत्याने भेदक मारा करून तुम्ही फलंदाजाला बाद करण्याचा प्रयत्न करायला हवा. कारण फक्त धावा वाचवण्याची रणनीती प्रत्येक वेळी यशस्वी होईल, असे सांगता येत नाही. झटपट विकेट मिळवत प्रतिस्पध्र्यावर दडपण आणायचे असते. गोलंदाजांकडून सुरुवातीला असे झाल्यास ते संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.’’
ब्रेट हा आक्रमक वेगवान गोलंदाज होता. फलंदाजाला बाद केल्यावर त्याच्यामधील आक्रमकपणा साऱ्यांनीच अनुभवला आहे. पण ही आक्रमकता मर्यादित असावी, असे ब्रेटला वाटते. ‘‘वेगवान गोलंदाज हा आक्रमक असायला हवा. पण ही आक्रमकता म्हणजे नेमके काय, हे त्याला माहिती असायला हवे. आक्रमकतेला एक मर्यादा असावी आणि या मर्यादेचे पालन प्रत्येकाने करायलाच हवे. जर तुम्ही ही मर्यादा ओलांडली तर तो एक खेळ राहणार नाही. खेळ हा आनंदासाठी खेळला जातो. त्यामुळे प्रत्येकाने आपण खेळत असल्याचे ध्यानात ठेवायला हवे.’’