Viral Cricket Video: क्रिकेटमध्ये फलंदाजांना बाद करण्याचे काही नियम आहेत. झेल घेणं, त्रिफळाचित, पायचीत आणि यष्टीचीत हे फलंदाजांना बाद करण्याचे सोपे नियम आहेत. तर आणखी एक नियम म्हणजे फलंदाजाला धावबाद करणं. जर एखादा फलंदाज धाव घेत असताना क्रिझमध्ये पोहोचला नसेल तर क्षेत्ररक्षक त्यांना बाद करू शकतात. पण अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेल्या क्रिकेट लीग स्पर्धेत फलंदाज क्रिझमध्ये पोहोचला होता, तरीसुद्धा क्षेत्ररक्षकांनी यष्टी उडवल्यानंतर त्याला बाद घोषित करण्यात आलं. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
अफगाणिस्तान टी -२० लीग स्पर्धेतील ९ व्या सामन्यात हा वाद झाल्याचे पाहायला मिळाले आहे. या सामन्यात स्पिन घर टायगर्स आणि अमो शार्क हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते.
या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना स्पिन घर टायगर्सचा संघ पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला. या संघाला पहिल्या डावात फलंदाजी करताना अवघ्या १२१ धावा करता आल्या.
हे आव्हान फार मोठं नव्हतं. पण धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या अमो शार्क संघाला सुरुवातीलाच मोठे धक्के बसले. अवघ्या ३० धावांवर या संघातील ३ फलंदाज तंबूत परतले होते. त्यामुळे धावांचा पाठलाग करणं कठीण झालं होतं. शाहीदुल्लाह कमाल आणि मोहम्मद इशाक यांनी ३१ धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली.
नेमकं काय घडलं?
तर झाले असे की, डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाने शॉट मारला. त्याने शॉट मारल्यानंतर धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही. पण नॉन स्ट्राईकला असलेल्या फलंदाजाने धाव घेण्याचा प्रयत्न केला.
पण स्ट्राइकवर असलेल्या फलंदाजाने धाव नाकारल्याने नॉन स्ट्राईकला असलेल्या फलंदाजाला परत माघारी जावं लागलं. त्यावेळी गोलंदाजाने थ्रो केला आणि त्याचा निशाणा थोडक्यात हुकला. त्यावेळी फलंदाजाने बॅट फेकली आणि ग्लोव्हज क्रिझच्या आत ठेवले. पण त्याने जेव्हा उठण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याचे ग्लोव्हज आणि बॅट क्रिझमध्ये नव्हती. याचा फायदा घेत क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने थ्रो मारला. हा निर्णय तिसऱ्या पंचाकडे पाठवण्यात आला. तिसऱ्या पंचांनी त्याला बाद घोषित केलं. या निर्णयावरून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यासह स्पोर्ट्समन स्पिरीटवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.