मुंबईत करोनाचा वाढता प्रादूर्भाव असला तरीही मुंबईत वानखेडे, Cricket club of India आणि नवी मुंबईतील डी-वाय पाटील स्टेडीयम हे ३ पर्याय बीसीसीआयला मिळणार आहेत. काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने तेराव्या हंगामासाठी २६ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबर ही तारीख निश्चीत केल्याचंही वृत्त आलं होतं, मात्र अधिकृतपणे यावर अद्याप कोणीही भाष्य केलेलं नाही. “मुंबई हा देखील बीसीसीआयसमोरचा एक पर्याय आहे. आगामी काळात नेमक्या काय गोष्टी घडतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे, पण एक गोष्ट निश्चीत आहे ती म्हणजे यंदा आयपीएल खेळवलं जाणार आहे.” BCCI मधील उच्चपदस्थ सूत्रांनी Sportskeeda ला माहिती दिली.
Bundesliga, La Liga, Series A यासारख्या स्पर्धा जर सुरु होत असतील तर मग आयपीएल का नाही?? कोणत्याही व्यक्तीला करोनाची लागण होणार नाही याची काळजी बीसीसीआय घेईल अशीही माहिती या सुत्राने दिली. ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषकाचं आयोजन केलं आहे. मात्र यंदा करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता ही स्पर्धा होण्याची शक्यता कमी आहे. खुद्द क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अधिकाऱ्यांनी याबद्दल माहिती दिली आहे. तरीही ही स्पर्धा भरवण्यासाठी आयसीसीने अद्याप कोणताही निर्णय घेतला नसून जुलै महिन्यात याबद्दल निर्णय घेतला जाणार आहे.