भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख रवी सवानी यांनी वैयक्तिक कारणास्तव शुक्रवारी राजीनामा दिला. सवानी यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला असून, सेवाशर्तीतील नियमानुसार ते पुढील एक महिना सेवेत असतील, अशी माहिती बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी दिली.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेत (आयसीसी) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची स्थापना केल्यानंतर २०१२मध्ये त्यांनी बीसीसीआयच्या याच विभागाची धुरा सांभाळली. सवानी यांनी एप्रिलमध्येच पदत्याग करण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. मात्र त्यांना आयपीएल संपेपर्यंत पदावर राहण्याची सूचना देण्यात आली होती.
बीसीसीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सल्लागार नीरज कुमार लवकरच सवानी यांच्या पदाचा भार स्वीकारतील, अशी चिन्हे आहेत. २०१३ मध्ये स्पॉट-फिक्सिंगप्रकरणी एस. श्रीशांत, अजित चंडिला आणि अंकित चव्हाण या राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूंना अटक झाली होती. या प्रकरणी चौकशीचे नेतृत्व दिल्लीचे माजी पोलीस आयुक्त नीरज कुमार यांनी केले होते.