भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये द्विदेशीय मालिकेची शक्यता धूसर झाली असून परतीच्या प्रवासावर निघालेल्या पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे(पीसीबी) अध्यक्ष शहरयार खान यांनी बीसीसीआय आणि सरकारवर टीका केली आहे. माघारी जाताना त्यांनी सामन्यांना विरोध करणाऱयांपुढे बीसीसीआय आणि सरकार झुकलं, असा आरोप केला आहे.

गेल्या तीन दिवसांपासून भारताच्या दौऱयावर असलेले शहरयार खान यांची सोमवारी बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांच्यासोबत मुंबईत होणारी बैठक शिवसेनेच्या विरोधामुळे होऊ शकली नाही. त्यानंतर दिल्लीला गेलेल्या शहरयार यांना तेथेही बीसीसीआयकडून भारत-पाक मालिकेबाबत कोणतेही ठोस उत्तर मिळालेले नाही. या सर्व प्रकारावर शहरयार यांनी नाराजी व्यक्त केली असून रिकाम्या हातांनीच परत जात असल्याबाबत निराश असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

विरोध करणाऱयांपुढे बीसीसीआय आणि सरकार झुकलं आहे. भारतात आम्हाला अशा प्रकारची वागणूक मिळेल असं वाटलं नव्हतं. आमचा अपेक्षाभंग झाला. मुंबईत जे घडलं त्यावर पाकिस्तानातही मोठ्या प्रमाणावर निषेध व्यक्त होत आहे. त्यामुळेच आम्ही आता निराशमनाने पाकिस्तानात परत जाण्याचा निर्णय घेतला आहे, असे शहरयार म्हणाले. बीसीसीआयने अनेकदा सुरक्षेचे कारण देऊन पाकिस्तानात खेळण्यास नकार दिला. मात्र, आता परिस्थिती उलटी आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते सहजपणे बीसीसीआयच्या कार्यालयात घुसू शकले. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास येथील प्रशासन अयशस्वी ठरले. त्यामुळे भारतात इतका टोकाचा विरोध असेल तर आमचे खेळाडूही येथे कसे खेळू शकतील? अशी भावना पाकिस्तानात व्यक्त केली जात असल्याचे शहरयार म्हणाले. आम्ही आता जास्त वेळ वाट बघणार नाही. भारतीय संघ पाकिस्तानशी सामने खेळणार की नाही याचे बीसीसीआयने लवकरात लवकर उत्तर द्यावे, असा इशारा देखील खान यांनी दिला आहे.