scorecardresearch

IPL 2022 Final GT vs RR Final : बीसीसीआयच्या नावे अनोख्या विक्रमाची नोंद, तयार केली जगातील सर्वात मोठी क्रिकेट जर्सी

जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर बीसीसीआयने सर्वात मोठ्या क्रिकेट जर्सीचे अनावरण केले आहे.

World's Largest Cricket Jersey
फोटो सौजन्य – आयपीएल डॉट कॉम

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) या टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेचा थरार अंतिम टप्प्यात आला आहे. आपल्या पहिल्याच हंगामामध्ये थेट अंतिम सामन्यात धडक मारलेल्या गुजरात टायटन्सची लढत राजस्थान रॉयल्ससोबत सुरू आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर या स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जात आहे. गुजरातच्या अहमदाबाद शहरामध्ये असलेले हे स्टेडियम जगातील सर्वात मोठे क्रिकेट मैदान आहे. या ठिकाणी १ लाख ३२ हजार प्रेक्षक बसू शकतात. याच मैदानावर अंतिम सामन्याच्या पूर्वी झालेल्या समारोप सोहळ्यात एक जागतिक विक्रम नोंदवण्यात आला.

जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर बीसीसीआयने सर्वात मोठ्या क्रिकेट जर्सीचे अनावरण केले आहे. यामुळे ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये बीसीसीआयच्या नावे विक्रमाची नोंद झाली आहे. पांढऱ्या रंगाच्या या जर्सीवर आयपीएलमधील १० संघांच्या लोगोसह आयपीएलचा १५ वर्षांचा प्रवासही कोरण्यात आला आहे. या सर्वात मोठ्या जर्सीची लांबी ६६ मीटर तर रुंदी ४२ मीटर इतकी आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शाह आणि आयपीएल अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी समारोप समारंभात ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’च्या अधिकाऱ्याकडून विक्रमाचे प्रमाणपत्र स्वीकारले. आयपीएल समारोप समारंभात बॉलिवुड अभिनेता रणवीर सिंग आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संगीतकार ए आर रहमान यांनी सादरीकरण केले.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bcci displays worlds largest cricket jersey enters in guinness book of world record vkk

ताज्या बातम्या