रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या बाद फेरीत पोहोचलेल्या संघांना उत्तेजक द्रव्य सेवन चाचणी देणे अनिवार्य असून याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोमवारी खेळाडूंना एका व्याख्यानाद्वारे मार्गदर्शन केले.
सोमवारी महाराष्ट्राचा संघ पुण्याहून मुंबईला उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळण्यासाठी दाखल झाला होता, पण सराव करण्यासाठी महाराष्ट्राचा संघ संध्याकाळी मैदानात उतरला. कारण त्यापूर्वी मुंबईच्या संघाबरोबर महाराष्ट्राच्या संघाला बीसीसीआयकडून उत्तेजक द्रव्य सेवन चाचणीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या दोन संघांबरोबरच कर्नाटक, बंगाल आणि रेल्वे या तीन संघांनाही बीसीसीआयकडून उत्तेजक द्रव्य सेवन चाचणीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
*‘मोसमाच्या सुरुवातीलाच उत्तेजक द्रव्य सेवनाविरोधात प्रत्येक खेळाडूला माहिती असायला हवी, हा आमचा हेतू होता. प्रत्येक संघाला ही चाचणी अनिवार्य असेल,’’ असे बीसीसीआयचे खेळ विकास महाव्यवस्थापक रत्नाकर शेट्टी यांनी सांगितले.
*‘रणजी करंडक स्पर्धेच्या बाद फेरीपासून उत्तेजक द्रव्य सेवन चाचणी अनिवार्य असेल. त्यामुळे जेव्हा संघातील हे खेळाडू ही चाचणी देण्यासाठी जातील, तेव्हा ते याबाबत अनभिज्ञ असायला नको, हा यामागचा उद्देश आहे. प्रत्येकाला याबाबतचा अर्ज भरणे आणि पाठवणे अनिवार्य आहे. काही संघ आणि त्यातील खेळाडू बुची बाबू स्पर्धेमध्ये व्यस्त असले तरी बाद फेरी सुरू होण्यापूर्वी आम्ही आमचे काम नक्कीच पूर्ण करू.’’
– रत्नाकर शेट्टी, बीसीसीआयचे खेळ विकास महाव्यवस्थापक