BCCI Earnings Doubles: भारतीय संघ क्रिकेटच्या मैदानावर आपल्या उत्कृष्ट कामगिरीने इतर संघांना मागे टाकत पुढे जात आहे. त्याप्रमाणे आता भारताचं क्रिकेट बोर्ड बीसीसीआय कमाईच्या बाबतीतही सातत्याने पुढे जाताना दिसत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयच्या कमाईत सातत्याने झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. गेल्या ५ वर्षांमध्ये बोर्डाला हजारो कोट्यवधींचा नफा झाला आहे.

बीसीसीआयच्या कमाईबाबत एक नवा रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टमधील बीसीसीआयची कमाई पाहून सर्वांचे डोळे विस्फारले आहेत. रिपोर्ट्सच्या मते २०१९ मध्ये भारताच्या क्रिकेट बोर्डाच्या बँकेत ६०५९ कोटी रूपये होते, या रक्कमेने मोठी झेप घेत आता आकडा २०६८६ कोटी रूपयांवर जाऊन पोहोचला आहे.

BCCIच्या बँक बॅलन्समध्ये किती कोटींची वाढ

गेल्या आर्थिक वर्षातच बोर्डाने ४१९३ कोटी रुपये कमावले. जगातील इतर कोणत्याही क्रिकेट बोर्डाने इतके कमावले नसावेत. बीसीसीआय हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, गेल्या ५ वर्षात बीसीसीआयच्या बँक बॅलन्समध्ये १४,६२७ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. २८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोर्डाच्या उत्पन्नाबाबत अधिक माहिती देता येईल.

२०२४च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सांगण्यात आलं की २०१९ पासून बीसीसीआयचा रोख निधी आणि बँक बॅलन्स तब्बल ६,०५९ कोटींवरून २०,६८६ कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. ही वाढ राज्य क्रिकेट संघटनांना सर्व देयकं दिल्यानंतरची आहे.

२०१९ पासून गेल्या पाच वर्षांत क्रिकेट बोर्डाच्या बँकेत १४,६२७ कोटी रुपयांची भर घातली आहे. याशिवाय, २०१९ पासून सर्वसाधारण निधी देखील ३,९०६ कोटी रुपयांवरून ७,९८८ कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. याशिवाय, मंडळाने २०२३-२४ या वर्षासाठी ३१५० कोटी रुपये कर भरण्यासाठी ठेवले आहेत.

रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयचा महसूल यापेक्षा खूप जास्त असता, परंतु आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून मिळणारा एकूण मीडिया हक्कांचा महसूल मागील वर्षाच्या २,५२४.८० कोटी रुपयांच्या तुलनेत घटून ८१३.१४ कोटी रुपये झाला. मागील वर्षाच्या तुलनेत कमी आंतरराष्ट्रीय सामने/मालिका खेळल्या गेल्यामुळे हा फटका बसला आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२३ मध्ये बीसीसीआयने आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३चे (ODI World Cup) यजमान म्हणून आयोजित केला होता,” असे अहवालात म्हटले आहे.

आंतरराष्ट्रीय दौऱ्यांमधून मिळणारा महसूल:
टीम इंडियाने आंतरराष्ट्रीय दौरे आणि स्पर्धांमधून मिळालेला एकूण महसूल घटून ३६१.२२ कोटी रुपयांवर आला आहे, जो मागील वर्षी ६४२.७८ कोटी रुपये होता.

गुंतवणूकीतून मिळणारं उत्पन्न:

बीसीसीआयला बँक ठेवींवरील व्याजातून ९८६.४५ कोटी रुपये उत्पन्न मिळाले, जे मागील वर्षाच्या ५३३.०५ कोटी रुपयांच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे. जय शहा यांच्या मार्गदर्शनाखाली बीसीसीआयने प्रमुख राष्ट्रीयीकृत आणि खासगी बँकांकडून कमी जोखमीमध्ये मार्केटमधील सर्वोच्च परतावा (ROI) मिळवण्यात यश मिळवलं आहे.

सरप्लस

उत्पन्न खर्चापेक्षा जास्त राहून बीसीसीआयला १,६२३.०८ कोटी रुपयांचा सरप्लस मिळाला आहे, जो मागील वर्षाच्या १,१६७.९९ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. हा वाढलेला सरप्लस मुख्यत्वे आयपीएल २०२३ मधील नफा आणि आयसीसीकडून मिळालेल्या वितरणामुळे झाला आहे.

खर्च

“कमाईसह बीसीसीआयच्या खर्चातही वाढ झाली आहे. गेल्या वर्षीचा खर्च १,१६७.९९ कोटी रुपये होता, जो आता वाढून १,६२३.०८ कोटी रुपये झाला आहे. याशिवाय बीसीसीआयने पायाभूत सुविधांच्या विकासासाठी १,२०० कोटी रुपये, प्लॅटिनम जुबली बेनेवोलंट फंडासाठी ३५० कोटी रुपये आणि क्रिकेट विकास निधीतील पायाभूत सुविधांसाठी ५०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. अहवालांनुसार राज्य क्रिकेट संघटनांना निधी देण्यासाठी अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत.

“राज्य क्रिकेट संघटनांना निधी वाटपासाठी मोठ्या प्रमाणावर तरतुदी करण्यात आल्या आहेत. २०२३-२४ या वर्षात एकूण १,९९०.१८ कोटी रुपये वितरित करण्यात आले असून, २०२४-२५ साठी अंदाजित तरतूद २,०१३.९७ कोटी रुपयांची आहे,” असा उल्लेख अहवालात करण्यात आला आहे.