बीसीसीआयचे पायउतार झालेले अध्यक्ष एन. श्रीनिवासन आणि बोर्डाचे नवनियुक्त सचिव अनुराग ठाकूर यांच्यातील वाद आता चांगलाच तापू लागला आहे. क्रिकेटच्या शुद्धीकरणाचा वसा घेतलेल्या ठाकूर यांनी श्रीनिवासन यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या कार्याध्यक्षपदावरून गच्छंती व्हावी या दृष्टीने त्यांच्याविरोधात चौकशीचे संकेत दिले आहेत.
श्रीनिवासन आणि ठाकूर यांच्यातील शीतयुद्ध सर्वश्रुत आहे. मात्र ठाकूर यांचे कथित बुकींसह छायाचित्र प्रसिद्ध झाले. या छायाचित्रामुळे आयसीसीनेही ठाकूर यांना अशा व्यक्तींपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. आयसीसीची सूत्र श्रीनिवासन यांच्या हाती असल्यामुळेच हा सल्ला मिळाल्याचे लक्षात येताच ठाकूर यांनी श्रीनिवासन यांच्यावर हल्लाबोल केला. सट्टेबाजी प्रकरणात दोषी आढळलेल्या आप्तस्वकीयांबद्दल माहिती श्रीनिवासन यांनी आधी जाहीर करावी आणि नंतर लोकांना सल्ला द्यावा, असे ठाकूर यांनी त्यांना सुनावले.
बीसीसीआयच्या अध्यक्षपदी असताना श्रीनिवासन यांनी घेतलेल्या निर्णयांची चौकशी करणे आवश्यक आहे, असे ठाकूर यांनी स्पष्ट केले. ‘‘विशेष कार्यकारिणी बैठक हा त्यासाठी पर्याय आहे. बीसीसीआय सर्व प्रकरणांची चौकशी करेल. कोणाहीविरुद्ध पुरावे आढळल्यास निश्चित कारवाई करण्यात येईल. आयसीसीमध्ये श्रीनिवासन हे बीसीसीआय निर्देशित आहेत. त्यांचा कार्यकाळ सप्टेंबपर्यंत आहे. सर्व पुराव्यांची शहानिशा केल्यानंतर त्यांना कार्याध्यक्षपदी कायम राहू द्यायचे की नाही यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल. बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांशी मी या संदर्भात चर्चा केली आहे. सविस्तर अहवाल आल्यानंतरच कार्यवाही करता येईल.’’, असे ठाकूर यांनी स्पष्ट केले.