क्रिकेट मंडळासोबतच्या आर्थिक वादामुळे दौरा अर्धवट सोडणाऱ्या वेस्ट इंडिजच्या खेळाडूंबाबत आता बीसीसीआयने कडक धोरण स्वीकारले आहे. आयपीएलमध्ये सहभागी होणाऱ्या विंडीजच्या खेळाडूंचा पुनर्आढावा घेण्यात येईल, असे संकेत बीसीसीआयने दिले आहेत. बीसीसीआयच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, विंडीजच्या खेळाडूंच्या भूमिकेवर आयपीएल प्रशासकीय समितीच्या बैठकीसुद्धा चर्चा होईल. विंडीजच्या खेळाडूंवर किमान एका आयपीएल हंगामाची बंदी घालण्यात यावी, अशी मागणी काही कार्यकारिणी सदस्यांकडून होत आहे. ख्रिस गेल, किरॉन पोलार्ड आणि ड्वेन ब्राव्हो यांच्यासारख्या खेळाडूंचे राहणीमान आयपीएलमुळे उंचावले आहे. भारतीय क्रिकेटरसिकांनी त्यांच्यावर बरेच प्रेम केले. त्यांचा या खेळाडूंनी अनादर केला आहे, असे मत व्यक्त होत आहे.
बीसीसीआयची तातडीची बैठक २१ ऑक्टोबरला
नवी दिल्ली : भारत दौऱ्यावरून वेस्ट इंडिज संघाने तडकाफडकी माघार घेतल्यामुळे या प्रकरणी गांभीर्याने चर्चा करण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने २१ ऑक्टोबरला हैदराबादला तातडीची कार्यकारिणी समितीची बैठक बोलावली आहे.

भारत दौरा आमच्यासाठी खडतर होता. त्यामुळे क्रिकेट किंवा चाहत्यांना त्याची झळ बसावी, अशी आमची अजिबात इच्छा नव्हती. या परिस्थितीत निर्णय घेण्याची वेळ आली होती. संपूर्ण संघ माझ्या पाठीशी आहे. कठीण परिस्थितीतही खेळाडूंनी मैदानावर चांगली कामगिरी केली!
-ड्वेन ब्राव्हो