आयपीएल स्पॉट-फिक्सिंग आणि गैरव्यवहारप्रकरणी गोत्यात आलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सर्वोच्च न्यायालयाला तीन सदस्यीय समितीची नावे सुचवली आहेत. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी बीसीसीआयला चांगल्या व्यक्तींचा समावेश असलेली समिती स्थापन करण्याचे आदेश दिले होते.
बीसीसीआयच्या कार्यकारी समितीच्या रविवारी मुंबईत झालेल्या बैठकीत चौकशी समितीत तीन जणांची नावे सर्वोच्च न्यायालयाला सुचविण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला. या सदस्यांमध्ये भारताचे माजी अष्टपैलू खेळाडू रवी शास्त्री, कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश जे. एन. पटेल आणि केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाचे माजी संचालक आर. के. राघवन यांचा समावेश आहे. लोकसभेचे माजी सभाध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांच्याही नावाचा विचार करण्यात आला होता, पण कार्यकारी समितीने तीन जणांचाच या समितीत समावेश करण्याचे ठरवले.
‘‘आता या तीन जणांपैकी कुणाची अध्यक्षपदी निवड करायची, याचा निर्णय सर्वोच्च न्यायालय घेईल. चौकशी समितीसाठी नावे सुचवण्याची जबाबदारी आमची होती, ती आम्ही पार पाडली आहे,’’ असे या बैठकीला उपस्थित असलेल्या बीसीसीआयच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले. बीसीसीआयचे सचिव संजय पटेल हे अधिकृतपणे सदस्यांची नावे जाहीर करण्यासाठी उत्सुक नव्हते. आम्ही ही नावे फक्त सर्वोच्च न्यायालयाला सांगणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
मुंबई क्रिकेट असोसिएशनचे संयुक्त सचिव पी. व्ही. शेट्टी म्हणाले, ‘‘सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीत श्रीनिवासन यांच्या जागी कुणाला संधी द्यायची, हे ठरवण्यासाठी पुढील महिन्यात विशेष सर्वसाधारण सभा घेण्यात येणार आहे. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ात ही बैठक होईल. रविवारी कार्यकारी समितीची बैठक चांगली झाली. चौकशी समितीत सुचविण्यात आलेल्या नावांवर बीसीसीआयच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.’’
बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शशांक मनोहर हे विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे प्रतिनिधी म्हणून या बैठकीला उपस्थित होते. कार्यकारी समितीच्या बैठकीत सहभाग नसलेल्या तीन असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनीही हजेरी लावली होती. केरळचे पी. सी. मॅथ्यू, सौराष्ट्रचे निरंजन शाह आणि त्रिपुराचे अरिंदम गांगुली या बैठकीला उपस्थित होते. राघवन यांनी १९९९-२००० सालच्या मॅच-फिक्सिंग प्रकरणाच्या चौकशीत महत्त्वाची भूमिका बजावली होती. ‘‘चौकशी समितीचा सदस्य या नात्याने मी माझ्याकडून सर्वोत्तम योगदान देण्याचा प्रयत्न करणार आहे. हे प्रकरण माझ्यासाठी नवे नाही. सीबीआयचा प्रमुख असताना मी १९९९-२००० सालचे मॅच-फिक्सिंग प्रकरणही हाताळले होते. त्या वेळचा अनुभव या वेळी कामी येईल,’’ असे राघवन यांनी सांगितले.
बीसीसीआयचे माजी अध्यक्ष ए. सी. मुथय्या यांनी या समितीतील रवी शास्त्री यांच्या सहभागाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ‘‘शास्त्री हे आयपीएलचा भाग असून क्रिकेट समालोचनही करतात. त्यामुळे वैयक्तिक चौकशी समितीत शास्त्री यांचा सहभाग मला रुचलेला नाही,’’ असे मुथय्या म्हणाले.
शास्त्रींच्या निवडीवर वर्माचा आक्षेप
नवी दिल्ली : बीसीसीआयने नेमलेल्या तीन सदस्यीय समितीवर बिहार क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदित्य वर्मा यांनी आक्षेप घेतला आहे. या समितीतील रवी शास्त्री यांच्या निवडीवर वर्मा यांनी आक्षेप घेतला आहे. आयपीएल स्पॉट-फिक्सिंग प्रकरणाची चौकशी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागातर्फे किंवा राष्ट्रीय गुप्तचर संस्थेकडून व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bcci to suggest three member panel to probe ipl spot fixing
First published on: 21-04-2014 at 02:32 IST