खराब फॉर्मात असल्यामुळे मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपल्या भवितव्याविषयी निवड समितीशी चर्चा केली; पण या चर्चेविषयी आपण अनभिज्ञ असल्याचा दावा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) केला आहे.
बीसीसीआयच्या मुख्यालयात मंगळवारी निवड समितीच्या झालेल्या बैठकीत सचिनने निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील यांच्याशी आपल्या भवितव्याबाबत चर्चा केली. यावर प्रतिक्रिया देताना निवड समितीचे समन्वयक संजय जगदाळे म्हणाले की, ‘‘या चर्चेविषयी मला कोणतीही कल्पना नाही.’’
दोन दशके क्रिकेटवर अधिराज्य गाजवणाऱ्या सचिनने आपल्या निवृत्तीविषयी, भवितव्यातील योजनेविषयी निवड समितीशी चर्चा केली. मात्र निवृत्तीचा निर्णय तू स्वत:च घे, असे निवड समितीने सचिनला सांगितले, असे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सिडनी कसोटीनंतर सचिन खराब फॉर्मात आहे. दोन दिवसांपूर्वी इंग्लंडविरुद्ध झालेल्या मुंबई कसोटीतही घरच्या मैदानावर सचिन दोन्ही डावांत अपयशी ठरला. मॉन्टी पनेसारने त्याला आपल्या फिरकीच्या जाळ्यात खेचत दोन्ही वेळा बाद केले. २२त्यामुळे त्याच्यावर सर्वत्र टीकेची झोड उठत आहे. मायदेशातील गेल्या चार कसोटी सामन्यात सचिन पाच वेळा पायचीत बाद झाला आहे. वाढते वय सचिनच्या अपयशास कारणीभूत ठरत आहे, असे काही तज्ज्ञांचे मत आहे.
मुंबई कसोटी जिंकून इंग्लंडने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली तरी उर्वरित दोन सामन्यांसाठी निवड समितीने संघात फारसे बदल केले नाहीत. अनुभवी खेळाडूंवर विश्वास दाखवत फक्त जायबंदी उमेश यादवच्या जागी अशोक दिंडाला निवड समितीने संघात संधी दिली.