भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची मालिका फारच अटीतटीची झाली. दोन्ही संघांतील खेळाडूंनी संघासाठी कमालीची कामगिरी केली आहे. प्रत्येक सामन्यात नवा खेळाडू विजयाचा नायक ठरला. याचबरोबर सामन्यात तर धावांचा पाऊस पडलेला पाहायला मिळाला. २-२ अशी बरोबरीत राहिलेल्या या मालिकेत स्लेजिंग आणि वादही पाहायला मिळाले. पण यानंतर आता भारताचा गोलंदाज आकाशदीपवर आयसीसीने बंदी घालावी अशी मागणी केली जात आहे; नेमकं काय प्रकरण आहे, जाणून घेऊया.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेत सामन्यादरम्यान अनेक वाद पाहायला मिळाले. दोन्ही संघातील खेळाडू एकमेकांना स्लेजिंग करताना दिसले. शुबमन गिल, झॅक क्राऊले यांच्यातील वाद, प्रसिध कृष्णा-जो रूट यांच्यातील वाद किंवा मग बेन डकेटसाठी आकाशदीपचा सेंडऑफ अशा घटनांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
पाचव्या कसोटी सामन्यात, आकाशदीप गोलंदाजी करत असताना सुरूवातीला डकेट त्याला म्हणाला, तू मला आऊट करू शकत नाहीस, यानंतर आकाशदीपनेच पुढच्या काही षटकांमध्ये डकेटला झेलबाद केलं. बेन डकेटला झेलबाद केल्यानंतर आकाशदीप त्याच्याजवळ गेला आणि खांद्यावर हात ठेवून त्याच्याशी बोलताना दिसला. दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली आणि हे प्रकरण तिथेच मिटलं. यानंतर दुसऱ्या डावातही दोघे एकमेकांशी गप्पा मारताना आणि खांद्यावर हात ठेवत बोलताना दिसले.
बेन डकेटच्या बालपणीच्या प्रशिक्षकांना मात्र हे आवडलेलं नाही आणि त्यांनी आयसीसीला या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. बेन डकेटच्या कोचने आकाशदीपवर बंदी घालण्याबद्दल वक्तव्य केलं आहे.
बेन डकेटचे बालपणीचे कोच नेमकं काय म्हणाले?
बेन डकेटचे बालपणीचे प्रशिक्षक जेम्स नॉट यांनी टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना म्हटलं आहे की, “ही एक अतिशय अटीतटीची मालिका होती, युवा खेळाडूंनी असं वागू नये याकरता कारवाई होणं गरजेचं आहे. पण वैयक्तिकरित्या, मला याचा काही फरक पडत नाही.”
“लोक अनेकदा म्हणतात की तो कदाचित खूप शांत आहे, पण डकेट जेव्हा मैदानात असतो तेव्हा तो खूपच आक्रमक खेळतो. तुम्ही अलीकडच्या कसोटी मालिकेत पाहिलं असेल. शुबमन गिलही म्हणाला की डकेट क्रीजवर असताना खेळण्याचं आव्हान स्वीकारायला आवडतं,” असं डकेटचे कोच पुढे म्हणाले.