सेऊल येथील १९८८ची संध्याकाळ! स्टेडियमवरील सर्व प्रेक्षक श्वास रोखून पाहत होते. शंभर मीटर धावण्याची शर्यत सुरू झाली आणि अवघ्या दहा सेकंदांच्या आत बेन जॉन्सनने ऑलिम्पिक सम्राट हे बिरुद लाभलेल्या कार्ल लुईसवर मात केली. चित्याच्या वेगाच्या तुलनेत धावणाऱ्या जॉन्सनने ऑलिम्पिक विक्रमासहीत सोनेरी कामगिरी केली. जगभरातील प्रसारमाध्यमांनी बेन जॉन्सनला डोक्यावर उचलून धरले.
मूळचा जमैकाचा असलेल्या या कॅनडाच्या धावपटूच्या यशाचा जल्लोष सगळीकडे झाला. मात्र हा जल्लोष अल्पकाळ ठरला. आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स महासंघाने जॉन्सन हा उत्तेजक चाचणीत दोषी ठरल्याचे कॅनडाच्या अॅथलेटिक्स महासंघास कळविले आणि सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसला. लुईसला ऑलिम्पिकमध्ये पराभूत करणारा धावपटू प्रसिद्धी मिळवलेला जॉन्सन हा क्षणार्धात शापित योद्धा झाला. तीन वर्षांच्या बंदीला त्याला सामोरे जावे लागले. १९९१मध्ये त्याने पुनरागमन केले खरे. मात्र पुन्हा १९९३मध्ये तो उत्तेजक चाचणीत दोषी ठरला. या वेळी त्याच्यावर तहहयात बंदी घालण्यात आली. गेली वीस वर्षे अज्ञातवासात असलेला हा धावपटू चर्चेत आला तो सेऊल येथील ऑलिम्पिक स्टेडियमला त्याने दिलेल्या भेटीमुळे! ज्या ट्रॅकवर आपल्या कारकिर्दीच्या शापित वळणाला सुरुवात झाली, त्या ट्रॅकची आठवण त्याला अस्वस्थ करत होती. उत्तेजक हा जणूकाही एक शाप आहे. या शापात मी फसलो, तुम्ही फसू नका, असेच सांगण्यासाठी त्याने या ट्रॅकला भेट देत आपल्या दुर्दैवी जीवनाची कैफियत मांडली.
लॉस एंजेलिसमधील १९८४च्या ऑलिम्पिकमध्ये जॉन्सनने १०० मीटर आणि ४ बाय १०० मीटर रिले धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदक मिळवले. तेथूनच लुईस व जॉन्सन या कडव्या प्रतिस्पध्र्यामधील ट्रॅकवरील युद्धाला सुरुवात झाली. १९८५मध्ये जॉन्सनने जागतिक इन्डोअर स्पर्धेतील ६० मीटर धावण्यात अजिंक्यपद मिळविले तसेच कॅनबेरा येथील जागतिक स्पर्धेत १०० मीटरची शर्यत जिंकून आपल्या भावी यशाची झलक दिली. १९८६मध्ये मॉस्को येथील सदिच्छा स्पर्धेत १०० मीटर शर्यतीत त्याने सुवर्णवेध घेतला. कारकिर्दीत त्याने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दोन सुवर्ण, दोन रौप्य व एक कांस्यपदकाची कमाई केली.
आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या लुईसवर जॉन्सनने रोम येथील जागतिक स्पर्धेत मात केली. त्यावेळी त्याने दिलेली ९.६३ सेकंद ही वेळ अतिशय लक्षणीय होती. लुईसवर मात केल्यामुळे त्याची कीर्ती जगभर पसरली. एका बहुराष्ट्रीय कंपनीने त्याला दरमहा ४.८० दशलक्ष डॉलर्सचे मानधन देत आपला ब्रॅण्ड अॅम्बेसेडर बनवले. हे वर्ष त्याच्याकरिता फलदायी ठरले. त्याला लोऊ मार्श पुरस्कार, लिओनेल कोनाक्टर पुरस्कार, असोसिएटेड प्रेसचा वर्षांतील सर्वोत्तम धावपटूचा पुरस्कार असे अनेक मानाचे पुरस्कार मिळाले. अनेक शर्यतींमध्ये विजेतेपद मिळविल्यानंतर त्याच्यापुढे एकच लक्ष्य होते ते म्हणजे ऑलिम्पिकच्या मैदानात लुईसला पराभूत करणे. येनकेनप्रकारे हे यश मिळविण्याच्या ध्येयाने झपाटलेल्या जॉन्सनने उत्तेजक औषध सेवन करण्याचा मार्ग पत्करला. आपण पकडले जाणार नाही, असा त्याचा भ्रम होता. मात्र सेऊल येथील ऑलिम्पिकमध्ये त्याने सोनेरी कामगिरी केल्यानंतर तो उत्तेजकाच्या कात्रीत सापडला. अवैध मार्गाने सुवर्णपदक मिळविणारा खेळाडू म्हणून तो ओळखला जाऊ लागला.
वेगवान धावपटूसाठी तीन वर्षांची बंदी म्हणजे खूप मोठा काळ असतो. त्याचा परिणाम त्याच्या तंदुरुस्तीवर होतो. उत्तेजकाचा गैरमार्ग स्वीकारल्यानंतर काय होते, याचे तो मूर्तिमंत उदारहण ठरला. १९९१मध्ये बंदीची मुदत संपल्यानंतर तो मैदानात उतरला. तथापि जागतिक स्पर्धेसाठी पात्रता निकष पूर्ण करण्यात तो अपयशी ठरला. दोन वर्षे प्रयत्न करूनही आपल्याला चांगले यश मिळत नाही, हे पाहून त्याने पुन्हा उत्तेजकाचा मार्ग स्वीकारला. तथापि हा मार्ग त्याच्यासाठी विनाशकारी ठरला. विनाशकाले विपरित बुद्धी अशीच त्याची स्थिती झाली. उत्तेजकाच्या विळख्यात सापडलेला तो सर्वात मोठा कीर्तिवान धावपटू होता.
संग्रहित लेख, दिनांक 28th Sep 2013 रोजी प्रकाशित
शापित योद्धा! :बेन जॉन्सन
सेऊल येथील १९८८ची संध्याकाळ! स्टेडियमवरील सर्व प्रेक्षक श्वास रोखून पाहत होते. शंभर मीटर धावण्याची शर्यत सुरू झाली आणि अवघ्या दहा सेकंदांच्या आत बेन जॉन्सनने ऑलिम्पिक सम्राट हे बिरुद लाभलेल्या कार्ल लुईसवर मात केली.

First published on: 28-09-2013 at 02:19 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ben jhonsaon hero of seoul olympic